नवरा आणि बायको यांच्यातील भांडणे (Husband Wife Quarrel) अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. महत्त्वाचे म्हणजे ती कोणत्याही टोकाला जातात. कधी कधी त्या भांडणाला कशाचीच तमा नसते. त्यामुळे अनेकदा ती चर्चेत येतात. उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) राज्यातील मऊ जिल्ह्यातील ( Mau District) एका जोडप्याची कहाणी काहीशी अशीच आहे. या जोडप्यातील पतीने चक्क ताडाच्या झाडावर (Palm Tree) मुक्काम ठोकला आहे. होय, बायकोसोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे तो सांगतो. राम प्रवेश असे या व्यक्तीचे नाव असून, सोशल मीडियावर तो भलताच लोकप्रिय झाला आहे.

राम प्रवेश याचे घर मध्य प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्यातील एका गावत आहे. बायकोच्या भांडणाला तो इतका वैतागला की चक्क झाडावरच आश्रय घेतला. राम प्रवेश याचे वडील विष्णुराम सांगतात की, बायकोशी सातत्याने होत असलेल्या भांडणाला कंटाळूनच तो झाडावर राहायला गेला आहे. सध्या तो गावच्या मध्यभागी असलेल्या ताडाच्या झाडावर राहतो. (हेही वाचा, Husband Wife Relationship: पत्नीला पतीसोबत राहण्यासाठी दबाव टाकता येणार नाही- उच्च न्यायालय)

नवरा बायकोची भांडणे खरं म्हणजे आळवावरच्या पाण्यासारखी असतात. कधी रुसवा कधी फुगवा. पण कधी कधी ही भांडणे अत्युच्च टोक गाठतात. गोष्टी अहंकारापर्यंत पोहोचतात. ज्यामुळे दोघेही आपापल्या मुद्द्यावर अडून राहतात आणि त्याचे पर्यावसण ताटातूटीत होते. उत्तर प्रदेशमधील राम प्रवेश याच्या बाबतीत असेच घडले आहे. तो सध्या ताडाच्या झाडावर मुक्कामाला आहे. त्याचे म्हणणे असे की, जोपर्यंत घरातील वडीलधारी मंडळी येऊन त्याच्याशी बोलत नाहीत किंवा त्यांच्या भांडणावर तोडगा काढत नाहीत तोपर्यंत तो झाडावरुन खाली उतरणार नाही. त्याच्या पत्नीने येऊन आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी आणि पुन्हा भांडणार नाही, असे वचन द्यावे, असेही रामप्रवेश याचे म्हणणे आहे.

राम प्रवेश याच्या वडीलांनी दावा केला आहे की, त्याची पत्नी त्याला (राम प्रवेश) सतत भांडण करुन शिव्या देत असे. पण ती त्याला मारहाणही करत असे. त्यामुळेच त्याने झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राम प्रवेश याचे गावाच्या मध्यभागी झाडावर राहणे त्याच्या गावकऱ्यांना मात्र आवडले नाही. गावकऱ्यांनी त्याच्या झाडावर राहण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील महिलांचे म्हणणे असे की, राम प्रवेश राहात असलेले झाड गावाच्या मध्यभागी आहे. हे झाड साधारण 100 फूट उंचीचे आहे. त्यामुळे झाडावर चढलेल्या व्यक्तीला आजूबाजूच्या परिसरातील गोष्टी ठळकपणे दिसतात. जवळच एक छोटेसे पाण्याचे ठिकाणही आहे. झाडावर चढल्याने राम प्रवेश याला गावातील नागरिकांच्या घरात काय चालले आहे, घरांबाहेर असलेली न्हानीघरे दिसू शकतात. त्याचे हे कृत्य म्हणजे आमच्या खासगी आयुष्यावर आलेला घालाच आहे, असे या महिला सांगतात. त्याच्या या कृत्यामुळे आमच्या अंगणातील सर्व गोष्टी त्याला दिसतात. त्यामुळे त्याने त्याचे वर्तन तातडीने बदलणे गरजेचे असल्याचे या महिला सांगतात.

गाववाल्यांचा दावा आहे की, आम्ही जेव्हा त्याला झाडावरुन खाली उतरण्यासाठी सांगतो तेव्हा तो वरुन खाली, दगड आणि विटा फेकतो. त्याच्या घरचे लोक त्याला दोरीने अन्न आणि पाणी पोहोचवतात.