
रहिवासी सोसायट्या (Resident Societies) आणि रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन (RWA) आपल्या रहिवाशांसाठी वेळोवेळी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असतात. आपल्या इमारतीच्या आवारात शिस्त, शांतता सुनिश्चित करून सदनिका मालक किंवा भाडेकरूंना जास्तीत जास्त आराम देण्यासाठी यातील बरेच नियम लागू केलेले असतात. मात्र काही सोसायट्यांचे नियम हे असे असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता एका विचित्र घटनेत, बेंगळुरूच्या (Bengaluru) कुंदनहल्ली गेट परिसरात असलेल्या एका सोसायटीने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे सध्या व्हायरल होत आहेत.
या नियमांनुसार सोसायटीमध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या अविवाहित लोकांना रात्री 10 नंतर त्यांच्या फ्लॅटमध्ये पाहुणे ठेवण्याची परवानगी नाही. जर अशा लोकांना रात्री 10 नंतर पाहुण्यांना आपल्या घरात ठेवायचे असेल तर, त्यांना ईमेलद्वारे मालकाकडून पूर्व संमती घेणे गरजेचे आहे. एका युजरने रेडीट (Reddit) वर सोसायटीच्या वतीने जारी केलेली नोटीस शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बॅचलर आणि स्पिनस्टर्सच्या फ्लॅटमध्ये रात्री 10 नंतर कोणत्याही पाहुण्यांना परवानगी नाही. तसेच पाहुण्यांना रात्रभर ठेवायचे असेल, मालक, व्यवस्थापक किंवा असोसिएशनला ईमेल करावा लागेल. सोसायटीमध्ये रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवू शकत नाही. रात्री उशिरा पार्ट्यांना परवानगी नाही. रात्री 10 नंतर कॉरिडॉर आणि बाल्कनीमध्ये फोनवर बोलण्यास परवानगी नसेल.’ (हेही वाचा: बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं OMG!)
असोसिएशनने म्हटले आहे की, अविवाहित लोकांनी नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे. उल्लंघन झाल्यास कोणतीही शिथिलता देता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड किंवा निष्कासन होऊ शकते. सध्या हे नियम सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत व त्यावर अनेक युजर्स सोसायटी प्रशासनावर टीका करत आहेत.