Jharkhand: बाप असावा तर असा! सासरच्या मंडळीकडून मुलीचा छळ; वडिलांनी बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत आणलं मुलीला परत
Father Brings Back Daughter (PC - Facebook)

Jharkhand: रांचीचा एका मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही लोक बँडसोबत गाताना आणि नाचताना दिसतात. यात एका मुलीला मोठ्या धूमधडाक्यात घरी नेले जात आहे. या मुलीचं नाव साक्षी आहे. काही वर्षांपूर्वीच साक्षीचं लग्न झालं होतं. मात्र, सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याने साक्षीच्या वडिलांनी तिला वाजतगाजत घरी आणलं. साक्षीचे वडील प्रेम गुप्ता यांनी म्हटलं आहे की, जर जोडीदार चुकीचा निघाला तर मुलीला सन्मानाने घरी आणले पाहिजे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षी गुप्ताचे लग्न एप्रिल 2022 मध्ये सचिन कुमारसोबत झाले होते. सचिन झारखंड विद्युत विभागात काम करतो. लग्नाच्या काही काळानंतर साक्षीला समजले की, तिचा नवरा आधीच विवाहित आहे. सासरच्या लोकांनीही साक्षीचा छळ करण्यास सुरुवात केली. वडील प्रेम गुप्ता यांना ही बाब कळताच त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपल्या मुलीला घरी आणण्याचा निर्णय घेतला. प्रेम गुप्ता यांनी साक्षीला अगदी वाजत-गाजत ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करत घरी आणलं.

आपल्या मुलीचे स्वागत करतानाचा व्हिडिओ शेअर करताना प्रेम गुप्ता यांनी लिहिलं आहे की, जेव्हा तुमच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले जाते आणि जर जोडीदार आणि त्याचे कुटुंब चुकीची वागणूक देत असतील तर तुम्ही तुमच्या मुलीला सन्मानाने तुमच्या घरी परत आणावे. कारण, मुली खूप मौल्यवान असतात. (हेही वाचा - Tragic Accident in Mangaluru: फुटपाथवरुन निघालेल्या नागरिकांना कारने उडवले, एकाचा मृत्यू, 4 महिला जखमी; घटनेचा Video Viral)

साक्षीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, अनेक मुलींसोबत असे घडते. पण त्या याबाबत घरच्यांना सांगत नाहीत. मी या सर्वातून बाहेर आली आहे असून आता खूप आनंदी आहे. घटस्फोटित व्यक्तींकडे आपल्या समाजात फार विचित्र नजरेने पाहिले जाते. विशेषतः मुलींना आदर दिला जात नाही. घटस्फोट घेऊन जगणे हे ओझ्यासारखे वाटते. अशा प्रकारे माझे स्वागत करण्याची कल्पना माझ्या आजीची आणि माझ्या वडिलांची होती. त्यांनी मला इतका सन्मान दिला की, मी आता समाजात ताठ मानेने जगू शकते. एवढं चांगलं कुटुंब मिळणं हे मी माझं भाग्य समजते.