लॉकडाऊनमध्ये बाहेर भेटण्याचा प्लॅन बनवत होते मित्र; पुणे पोलिसांनीही व्यक्त केली भेटण्याची इच्छा, मजेशीर ट्वीट व्हायरल
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) चालू आहे. आता तर हे 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. कोरोना विषाणू संक्रमितांच्या वाढत्या घटना पाहता सरकार सतत लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे (Pune Police) एक मजेशीर ट्वीट व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी लॉक डाऊनच्या काळात बाहेर भेटण्याची योजना आखत असलेल्या दोन मित्रांना कंपनी देण्याविषयी इच्छा व्यक्त केली आहे.

तर, इंद्रजीत आणि पार्थ या दोन मित्रांमध्ये ट्वीटरवर संवाद चालू आहे. यामध्ये पार्थ म्हणतो 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवल्याने भेटणे अवघड आहे, त्याला उत्तर देताना इंद्रजीत म्हणतो आपण त्या आधी भेटण्याचा प्रयत्न करूया. त्यावर पार्थ म्हणतो, ‘आपण आत्ता लगेच भेटू, तू फक्त जागा सांग. दोघेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहू’. यामध्ये अजून एका व्यक्तीने युनिफॉर्म घालून जा तुला कोणी अडवणार नाही असा सल्ला दिला आहे. त्यावर पुणे पोलिसांनी रिप्लाय केला आहे की, 'आम्हालाही तुम्हाला भेटायला व तुमच्यासोबत राहायला आवडेल. कधी आणि कुठे भेटूया हे तुम्ही सांगा.' पुणे पोलिसांच्या या विनोदी रिप्लाय मुळे सध्या हे ट्वीट व्हायरल होत आहे.

 

(हेही वाचा: व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा, कोरोनामुळे कोणी मरणार नाही!'या' देशाच्या राष्ट्रपतींचा नागरिकांना अजब गजब सल्ला)

लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वजण घरातच आहेत. अशात बाहेर भेटण्याची योजना आखत असलेल्या मित्रांना पुणे पोलिसांनी दिलेले हे उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान महाराष्ट्रात एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे.