भारत देश हा इथल्या परंपरा, संस्कृतीसाठी जगभरात ओळखला जातो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारताच्या सौंदर्याचे वर्णन करतात आणि त्यापैकी एक म्हणजे भारतातील संयुक्त कुटुंब पद्धती. जगभरातील अनेक देशांमध्ये संयुक्त कुटुंब ट्रेंड पहायला मिळाला, परंतु भारत ही परंपरा दीर्घकाळ अजूनही पाळत आहे. सध्या असेच एक कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आहे, जिथे तब्बल 72 सदस्य एकाच छताखाली राहत आहेत.
हे कुटुंब महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे शंभर वर्षांपूर्वी कुटुंब प्रमुख कर्नाटकातून आपल्या पत्नीसह सोलापूरमध्ये स्थायिक झाले होते. आता या कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत आहेत. या कुटुंबामध्ये एकूण 72 सदस्य गुण्यागोविंदाने राहत आहेत. डोईजोडे असे या कुटुंबाचे (Doijode Family) आडनाव आहे. रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबात दिवसाला दहा लिटरहून अधिक दूध लागते, तर सुमारे पंधराशे रुपये किमतीचा भाजीपालाच यांच्या घरी येतो.
72 members living under one roof. Yes, you read that right! The Doijode family pic.twitter.com/9FoULz0XFR
— krish💙 (@Iwillsayitall) November 15, 2022
घरातील स्त्रिया जेवण बनवण्यासाठी तब्बल सहा ते सात स्टोव्हचा वापर करतात. सर्वांचा स्वयंपाक एकत्रच होतो. कुटुंबातील महिला सदस्यांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला त्यांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येची भीती वाटत होती. पण आता त्यांना याची सवय झाली आहे व तो त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ज्या घरात हे महाकाय कुटुंब राहते त्या घराचे वीज बिल दर महिन्याला सुमारे 40-50 हजार रुपये येते. (हेही वाचा: Irani Bakery Mumbai: 100 वर्षे जुनी इराणी बेकरी रविवारी होणार बंद, राजेश खन्ना यांचा होता अड्डा)
या सदस्यांच्या कमाईच्या साधनांबद्दल बोलायचे झाले तर डोईजोडे कुटुंब अनेक प्रकारचा व्यवसाय करते. त्यांची अनेक कपड्यांची दुकाने आहेत. प्रत्येकाचे काम विभागलेले आहे. काही लोक दुकानात बसतात तर काही लोक कपडे घेऊन इतर ठिकाणीही विकतात. कुटुंबातील काही मुले शाळा-कॉलेजात जातात, तर काही मुली इतरही अनेक कामे शिकत आहेत. आपल्या व्यवसायातील यशाचे श्रेय हे कुटुंब आपल्या संयुक्त कुटुंब पद्धतीला देते. आजच्या काळात असे संयुक्त कुटुंब मिळणे फार दुर्मिळ आहे.