Fact Check: शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर पॉप सिंगर रिहाना चा हातात पाकिस्तानच्या झेंडा घेतलेला फोटो व्हायरल; जाणून घ्या सत्य
Rihanna Fake Picture (Photo Credits: File Image)

भारतातील शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर पॉप सिंगर रिहाना (Pop Star Rihanna) हिचा हातात पाकिस्तानचा झेंडा (flag of Pakistan) घेतलेला फोटो व्हायरल होत आहे. यात रिहाया स्टेडियममध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रिहानाने देशात शेतकरी आंदोलन, त्या दरम्यान झालेला हिंसाचार, ठप्प झालेली इंटरनेट सेवा एकूण संपूर्ण परिस्थितीवर आपली प्रतिक्रीया ट्विटच्या माध्यमातून दिली होती. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर एकच वादंग निर्माण झाला. रिहाना शिवाय ग्रेट थनबर्ग समवेत अन्य इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी कृषी कायद्याविरुद्ध भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

आपण शेतकरी आंदोलनावर चर्चा का करत नाही? असा प्रश्न रिहाना हिने ट्विटच्या माध्यमातून विचारला होता. तिच्या या ट्विटला 7 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले असून रिट्विट्सचा पाऊस पडत आहे. त्यानंतर आता तिचा पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

पहा ट्विट:

दरम्यान, रिहानाचा व्हायरल होत असलेला फोटो फेक असून हा फोटो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसी ने 2019 मध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला होता. या मूळ फोटोमध्ये रिहानाने वेस्ट इंडिजचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे रिहानाचा हा फोटो एडिट केला आहे, हे स्पष्ट होते. (शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या Greta Thunberg विरोधात दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल)

आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाची दखल घेतली गेल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात या मुद्द्यावरुन होणारा विदेशी हस्तक्षेप कमी व्हावा असे म्हटले आहे. तसंच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी आणि त्याबद्दल कोणतीही टिपण्णी करण्यापूर्वी तथ्यं महत्त्वाचे असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.