जयपूर (Jaipur) शहरातील अजमेर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. ज्यामुळे प्रत्यक्षदर्शींना मोठा धक्का बसला. शहरात संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरुन सुदर्शनपुरा पुलियाच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारला आग (Driverless Car Fire) लागली. ही आग इतकी भडकली की, पुढच्या काहीच क्षणात कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. धक्कादायक म्हणजे आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही पेटती कार (Driverless Car Fire Jaipur) चालकविरहीत होती आणि ती रस्त्यावरुन धावत होती. कार धावत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि उभ्या असलेल्या वाहन आणि नागरिकांनाही धोका होता. मात्र, पुढे ही कार जाऊन एका जुचाकीवर आदळली. ज्यामुळे ती थांबली आणि पुढील अनर्थ टळला.
चालत्या कारला आग
जयपूर शहरातील अजमेर रस्त्यावर सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, जळत असलेली कार जवळ येत असताना मोटारसायकलस्वार त्यांच्या दुचाकी सोडून सुरक्षित ठिकाणी धावताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीला ही कार मानसरोवर येथील पत्रकार वसाहतीतील दिव्य दर्शन अपार्टमेंटमधील रहिवासी जितेंद्र जांगिड यांच्या मालकीची आहे. घटना घडली तेव्हा ही कार चालवली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंच रस्त्यावर उतरताना जितेंद्रला कारच्या वातानुकूलन यंत्रणेतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने आपल्या भावाला बोलावले. त्याने बोनेट उघडून पाहायला सुरुवात केली मात्र, इंजिनमधून धूर येऊ लागला.
आग लागलेली कार रस्त्यावर धावली
कारच्या बोनेटमधून धूर येताच ते गाडीतून खाली उतरले. पण गाडीच्या हँडब्रेकचे नुकसान झाल्याने गाडी सुरुच राहिली आणि ती पुढे चालू लागली. पुढच्या काहीच वेळात संपूर्ण गाडी आगीच्या ज्वाळांनी वेढली. पण तरीही ही कार रस्त्यावरुन पुढे धावतच राहिली. आगीच्या ज्वाळा आणि धूर अशा विचित्र परिस्थीतीमध्ये ही कार रस्त्यावरुन धावत राहिली. ही कार थांबवायची कशी, हाच प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला होता. लोक घाबरुन सैरावैरा पळत होते. काही जण हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित करत होते. अखेर ही धावती कार रस्त्यावरुन एका ठिकाणी दुचाकीला जाऊन धडकली आणि थांबली. ज्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघात घडला असला तरी जीवित हानी टळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
जयपूरच्या रस्त्यावर धावली आगीच्या भक्षस्थानी पडलेली कार
A driverless car engulfed in flames descended an elevated road in #Jaipur, colliding with a parked bike before halting at a divider.
The driver noticed smoke coming from the car's air conditioning and stepped out to investigate. Read 🔗 https://t.co/0PmGIFfjeY pic.twitter.com/3b2NyMinyX
— The Times Of India (@timesofindia) October 13, 2024
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी आपत्कालीन यंत्रणेस संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर तत्काळ प्रतिसाद देत 22 गोडम येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.