Zomato Food Delivery (PC - Twitter)

Zomato Intercity Order: झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप (Zomato Food Delivery App) ने अलीकडेच त्याची इंटरसिटी फूड डिलिव्हरी सेवा (Zomato Inter-State Service) सुरू केली आहे. 'इंटरसिटी लीजेंड्स' (Intercity Legends) असे या सेवेचे नाव आहे. सध्या कंपनीने दिल्ली आणि गुरुग्राम या दोनच शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या सेवेच्या यशानंतरच, कंपनी हळूहळू इतर शहरांमध्ये सेवा देणार आहे. नुकतीच 'इंटरसिटी लेजेंड्स'शी संबंधित अशी एक बातमी व्हायरल होत आहे, जी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ग्राहकाने गुरुग्राममधून हैदराबाद बिर्याणीची ऑर्डर दिली होती. जेव्हा त्या व्यक्तीने पॅकेज उघडले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. बिर्याणीच्या ऑर्डरऐवजी त्याच्या पाकिटात सालानचा डबा आला.

झोमॅटोने 'इंटरसिटी लीजेंड्स' सेवा सुरू केल्यापासून दिल्ली आणि गुरुग्राममधील लोक या सेवेला चांगला प्रतिसाद देत आहेत. लोक घरी बसून इतर शहरांतील प्रसिद्ध पदार्थांचा लाभ घेऊ शकतात. या सेवेचा फायदा घेत गुरुग्राममध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हैदराबादची बिर्याणी ऑर्डर केली. त्यानंतर तो या ऑरर्डची आतुरतेने वाट पाहू लागला. बिर्याणीचे पॅकेट त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याला आश्चर्य वाटले. त्याला बिर्याणी ऐवजी फक्त सलानच पोचवल्याचं दिसलं जे बिर्याणीसोबत येतं. (हेही वाचा - Wheelchair बसून आली Swiggy Delivery Girl; घरून जेवण मागवणाऱ्या ग्राहकांला बसला धक्का)

ग्राहकांने ट्विटरवर केली तक्रार - 

आपण मागवलेली ऑर्डर न मिळाल्याने या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर केला आहे. प्रतीक कंवल असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रतीकने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'झोमॅटो इंटरस्टेट लिजेंड सर्व्हिस वापरून हॉटेल शादाबमधून चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. पण मला बिर्याणीऐवजी सालानचा छोटा बॉक्स मिळाला. माझा रात्रीच्या जेवणाचा प्लॅन फसला.'

या व्यक्तीने ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर झोमॅटोने तात्काळ कारवाई केली. व्यक्तीच्या या पोस्टला प्रतिसाद देत कंपनीने लिहिले की, 'तुमची संपूर्ण ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर करा. तुमची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.' ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागितली आणि त्याच्या ऑर्डरचा मागोवा घेण्याचे आश्वासनही दिले.