Screenshot of fake viral message (Photo Credits: WhatsApp)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संबंधित कोणतीही माहिती किंवा बातमी व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅप च्या माध्यमातून शेअर करण्यास मनाई केली आहे. कोरोना व्हायरसची व्हायरल होणारी कोणतीही माहिती, मेसेज शेअर केल्यास व्हॉट्सग्रुप वरील सर्व सदस्यांसह ग्रुप अॅडिमनला विरोधात कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरु लागला होता. मात्र प्रेस ब्युरो ऑफ इंडियाने (Press Bureau of India) याची तथ्यता तपासली असता हा मेसेज खोटा असल्याचे समोर आले आहे.

ग्रुपमधील सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की कोरोना व्हायरस संबंधित कोणतीही पोस्ट शेअर केल्यास केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात येईल. केवळ सरकारी यंत्रणा कोरोना व्हायरस संबंधित माहितीपर पोस्ट करतील. त्यामुळे कोरोना व्हायरस संदर्भात माहिती, पोस्ट शेअर करणाऱ्या ग्रुपमधील सर्व सदस्यांसह ग्रुप अॅडमिनवरही आयटी अॅक्टनुसार खटला दाखल करण्यात येईल. हे लक्षात ठेवा आणि सुरक्षित रहा, असे या मेसेजमध्ये लिहिले असून हा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला आहे. (Coronavirus Lockdown च्या काळात गोवा पोलिसांकडून नागरिकांना घाबरवून घरी बसवण्यासाठी 'भूता'चा वापर? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता)

गृह मंत्रालयाकडून हा मेसेज आला असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र या व्हायरल पोस्टमागील सत्यता पडताळून PIB कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याची माहिती PIB ने ट्विट करत दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, "अशा प्रकारचा कोणताही आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस संबंधित केवळ खऱ्या बातम्या शेअर करा अशी नागरिकांनी विनंती आहे. अधिकृत आणि खरे मेसेजेस शेअर करणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे."

PIB Fact Check Tweet:

कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांसाठी विशेष सूचनांची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच खोट्या बातम्या, अफवा पसवणाऱ्यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात येईल, असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.