Cobra Snake's Blood: सौंदर्य वाढविण्यासाठी 'या' देशातील स्त्रिया पितात सापांचे रक्त
King Cobra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आपण सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? सुंदरतेसाठी सामान्य लोकांपासून सेलेब्जपर्यंत अनेक लोक विविध गीष्टींचा वापर करतात. सेलिब्रिटी लोकांसाठी त्यांचा चेहरा, त्वचा, शरीरयष्टी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपली त्वचा नेहमी नितळ राहावी, सुरुकुत्या कमी व्हाव्या, सुंदरता टिकून राहावी म्हणून सेलेब्ज वेदनादायक आणि त्रासदायक उपचार अथवा थेरेपींचा वापर करतात. प्लेटलेट-रिच प्लाझमा थेरपी, कापिंग थेरपी अशा काही गोष्टी सेलेब्जमध्ये लोकप्रिय आहेत. यासह सामान्य लोकही आपल्या सुंदरतेसाठी काही हटके पर्याय अवलंबत असलेले दिसून येत आहेत. जगात अशी एक जागा आहे जिथे स्वत: चे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि तरूण राहण्यासाठी स्त्रिया सापांचे रक्त (Cobra Snake's Blood) पितात आणि हे ठिकाण म्हणजे जकार्ता (Jakarta).

सौंदर्य वाढविण्यासाठी, स्त्रिया बर्‍याच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करताना किंवा घरगुती उपचार करताना दिसतात. पण तुम्ही कधी एखाद्या मुलीला तरूण व सुंदर दिसण्यासाठी विषारी प्राण्यांचे रक्त पिताना पाहिले आहे? ऐकून आश्चर्य वाटेल ना?, पण जकार्तामध्ये असे घडत आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये महिला सौंदर्य वाढविण्यासाठी धोकादायक युक्ती वापरतात. त्या चक्क विषारी सापाचे रक्त पितात. त्यामुळे इथे सापाचे रक्त विकणारी दुकाने सर्वत्र आढळतात. पत्रिकाने याबाबत माहिती दिली आहे.

इथल्या स्त्रियांचा असा विश्वास आहे की सापाचे रक्त पिण्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी होते. यामुळे त्वचा सैल पडण्याचे प्रमाण कमी होते, तसेच त्वचेवरील डागही दूर केले जातात. इंडोनेशियामध्ये सापांचे रक्त पिण्याची परंपरा खूप जुनी आहे. इथे लोक सापदेखील खातात. इथले लोक सापांना गवतीचहासह उकळून किंवा तळून खातात. मीडिया रिपोर्टनुसार जकार्तामधील बहुतेक मुलींना अत्यंत विषारी साप समजल्या जाणाऱ्या कोब्राचे रक्त पिणे आवडते. (हेही वाचा: तारुण्य टिकवण्यासाठी सेलेब्ज करतात या विचित्र उपचारांचा वापर)

त्यांचा असा विश्वास आहे की, यामुळे त्वचा बर्‍याच काळासाठी आरोग्यदायी राहते व लवकरच सुरकुत्या पडत नाहीत. जकार्ताच्या बर्‍याच भागात संध्याकाळी 5  वाजल्यापासून कोब्रा स्टॉल्स सुरू होतातम जिथे कोब्रा रक्ताची विक्री रात्री एक वाजेपर्यंत चालू असते. असे म्हटले जाते की विषारी जीवाचे रक्त प्यायल्यानंतर 3 ते 4 तासांपर्यंत स्त्रिया चहा आणि कॉफी घेत नाहीत, ज्यामुळे हे रक्त शरीरात जाऊन प्रभावी ठरू शकेल.