प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

मुख्य प्राण्यांबद्दल, विशेषतः कुत्र्यांबद्दलचे लोकांचे प्रेम आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहत असतो. पाळीव प्राणी हे लोकांच्या जीवनाचा एक भाग झाले आहेत आणि लोकही त्यांना आपल्याच कुटुंबाचा भाग मानू लागले आहेत. आपल्या पाळीव प्राण्यांना स्पेशल फील करवण्यासाठी त्यांचे मालक पाण्यासारखा पैसा खर्च  करतात. सध्या असेल एक प्रकरण चीनमधून समोर आले आहे जे जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. चीनमध्ये एका कुत्र्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस खास बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

या खास कुत्र्याचे नाव Dou Dou असून तो चीनच्या हुनान प्रांतात आपल्या मालकिणीसोबत राहतो. या महिलेला आपल्या कुत्र्याचा इतका लळा आहे की, तिने त्याचा जंगी वाढदिवस साजरा करण्यासाठी तब्बल 11 लाख रुपये खर्च केले आहेत. ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल परंतु हे सत्य आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या ड्रोन शोच्या कार्यक्रमासाठी 520 ड्रोन वापरण्यात आले.

त्याद्वारे आकाशात 'Dou Dou: वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा' आणि ‘Dou Dou ला 10 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!’ असे लिहिले होते. वाढदिवसाचा हा व्हिडिओ TikTok या चिनी प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अनेक लोकांनी आपल्याला पुढच्या जन्मात कुत्रा बनायचे आहे, असे म्हटले आहे. (हेही वाचा:सापाने घातली सांताक्लॉजची टोपी, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त कुत्र्याच्या मालकिणीने स्वत: सांताक्लॉजचा ड्रेस तयार केला होता. या वाढदिवसाविषयी स्थानिक लोकांनी सांगितले की, त्यांनी याआधी फक्त लग्नात ड्रोन शो पाहिला होता, पण पहिल्यांदाच एका कुत्र्याच्या वाढदिवसामध्ये तो दिसला. ड्रोन रेंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याच्यामालकिणीला कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 30 मिनिटांचा ड्रोन शो हवा होता. यावेळी कुत्र्यांच्या आवाजात हॅपी बर्थडे गाणेही गायले गेले.