Mahabodhi Temple Cash Thievery Video: महाबोधी मंदिरातून पैसे चोरताना बौद्ध भिक्खू कॅमेऱ्यात कैद; चोरीनंतर भगवान बुद्धांच्या चरणांना स्पर्श करून मागितली माफी, पहा व्हिडिओ
Mahabodhi Temple Cash Thievery Video (PC -X/@kgoyal466)

Mahabodhi Temple Cash Thievery Video: बिहार (Bihar) मधील गया (Gaya) येथील महाबोधी मंदिरातून (Mahabodhi Temple) पैसे चोरीला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका बौद्ध भिक्षूने महाबोधी मंदिराच्या गर्भगृहातून पैसे चोरले. पैसे चोरल्यानंतर हा बौद्ध भिक्षू भगवान बुद्धांच्या चरणांना स्पर्श करताना आणि त्यांना नमस्कार करून क्षमा मागताना दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही घटना गर्भगृहात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बोधगया मंदिर व्यवस्थापन समितीने पोलिसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. समितीने सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सुपूर्द केले आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. सध्या या भिक्षूचा शोध सुरू आहे. (हेही वाचा -Diamond Theft in Mumbai: मालकीणीच्या घरातून नोकरांनी चोरले 50 लाखांचे डायमंड्स; खार मधील घटना)

बिहारमधील बोधगयाच्या महाबोधी मंदिरात भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. दरवर्षी लाखो बौद्ध भाविक, बौद्ध भिक्खू आणि विविध देशांतील विदेशी पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. महाबोधी मंदिराच्या गर्भगृहात भगवान बुद्धांचे दर्शन घेतल्यानंतर लोक महाबोधी वृक्षाखाली ध्यान करतात. गर्भगृहातील भगवान बुद्धांच्या मूर्तीखाली ठेवलेल्या दानपेटीतून पैसे चोरीला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गर्भगृहाची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या बौद्ध भिक्षूनेचं हे कृत्य केल्याने सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. गर्भगृहात सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बौद्ध भिक्खूची कृत्ये कैद झाली आहेत. (वाचा - Theft in Yesvantpur-Kannur Express: यशवंतपूर-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सामानाची चोरी; मौल्यवान वस्तू लुटल्या)

पहा व्हिडिओ - 

गर्भगृहाच्या सेवेत तैनात असलेले बौद्ध भिक्षू रात्री उशिरा गर्भगृहात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो दानपेटी उघडतो आणि त्यातून पैसे काढतो. पैसे त्याच्या कपड्याच्या खिशात ठेवतो. त्यानंतर तो भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करतो आणि नतमस्तक होतो. सकाळी गर्भगृहात पूजेसाठी आलेल्या लोकांना दानपेटी उघडी दिसली. तसेच दानपेटीचे सरंक्षण करणारा बौद्ध भिक्षूही गायब असल्याचं लोकांना समजलं. त्यानंतर चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता बौद्ध भिक्षू चोरी करताना आढळून आला. चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.