गौतमी पाटील | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपचे (BJP) मिशीवाले (Mustache) आमदार डॉ. संदीप धुर्वे (Sandeep Dhurve) यांनी गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यासोतब केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. बळीराजाच्या नुकसान आणि दु:खाला पारावार राहीला नाही. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळी आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संदीप धुर्वे हे मात्र 'चांदी की डाल पर सोने का मोर' गाण्यावर गौतीमी पाटील (Gautami Patil Dance Video) सोबत ठुमके लावताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र होत आहे.

नेमके काय घडले?

भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड येथे दहिहंडी महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्त जिल्हा परिषद शाळा प्रांगणात 3 सप्टेंबर रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटील म्हटले की, गर्दी नेहमीच जमते. याहीवेळी ती जमली होती. गर्दी पाहून आमदार संदीप धुर्वे यांना चांगलाच चेव आला. त्यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण ज्या भागातून येतो त्या भागात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती काय आहे, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत थेट ठेकाच धरला. आमदाराने स्टेजवर नाचणे यात काहीही गैर अथवा अनैतिक नसले तरी, लोकप्रतिनधीच्या वर्तनाबाबत काही संकेत पाळले जातात. हे संकेत मोडल्याची आणि त्यांना जबाबदारीचे भान नसल्याचे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, या कार्यक्रमास मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील हे देखील उपस्थित होते. (हेही वाचा, Abdul Sattar Obscene Language Video: गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना अश्लील भाषेत जाहीर आदेश, मंत्री अब्दुल सत्तार नव्या वादात (Watch Video))

आमदार संदीप धुर्वे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, चौफेर होत असलेली टीका आणि प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्त यातून विरोधात उमटलेला जनमताचा सूर पाहून आमदार महोदयांनी लागलीच स्पष्टीकरण दिले. आमदार संदीप धुर्वे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि तरुण जमले होते. आमच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी म्हटले की, भाऊ सगळी तरुण मंडळी आहे. तुम्ही जरा ठेका धरला तर त्यांनाही आनंद होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांना खुशी मिळावी म्हणून मी थोडासा नाचलो. त्यांनाही खुशी मिळाली. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा तर माझ्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आणणारा मीच आमदार आहे, असेही ते म्हणाले.  (हेही वाचा, Gautami Patil New Video: गौतमी पाटील म्हणते 'अहो पाव्हणं.. चिज मी लई कडक')

मिशीवाल्या आमदाराचा गौतमीसोबत डान्स

दरम्यान, गौतमी पाटील या सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील आघाडीच्या डान्सर आहेत. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. अनेकदा ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांवरही ताण येतो. त्यामुळे मधल्या काळात पोलिसांनीच गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास मज्जाव केल्याच्या बातम्या आल्या होत्या.