जगभरात कोविड 19 संकटामधून लोकं सावरत असताना आता अनेक देशांनी कठोर निर्बंध शिथिल केले आहेत. पण चीन मात्र अद्यापही त्याला अपवाद आहे. चीन मध्ये Zero-COVID policy चं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना आहे. या कठोर निर्बंधांबाबत सध्या जनसामन्यांमध्ये असंतोष आहे. याला वाट मोकळी करून देताना चीनी लोकांनी चक्क बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरींच्या (Bappi Lahiri) गाण्याची मदत घेताना दिसत आहेत. बप्पी लहरींच्या 'डिस्को डांसर' सिनेमातील ' जिम्मी जिम्मी.. आजा आजा...' हे गाणं सध्या चीनी लोकांच्या ओठांवर आहे.
TikTok च्या चीनी अॅप Douyin वर काही मजेशीर व्हिडिओ शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये बप्पी लहरींचं जिम्मी जिम्मी गाणं वाजत आहे. Mandarin भाषेत "Jie mi, jie mi" चा अर्थ 'भात द्या भात द्या' असा होतो. या गाण्यावर अनेकजण हातात रिकामा टोप घेऊन भात/ तांदूळ मागण्याची अॅक्शन करत आहेत. लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक वस्तूंची देखील वाणवा होत असल्याचं त्यांच्याकडून दाखवलं जात आहे.
पहा मजेशीर व्हिडिओज
《借米》火了!一切信号都告诉你 #粮食危机 pic.twitter.com/HXHScw1cP4
— 历史铭记(澳喜特战旅.第6号) (@guozhanshi) October 30, 2022
चीनी बॉक्सऑफिसवर बॉलिवूडच्या सिनेमांची चलती ही काही नवी बाब नाही. 80,90 च्या दशकामध्ये राज कपूर यांच्या अनेक सिनेमांना चीनी रसिकांनीही डोक्यावर घेतले आहे. त्यानंतर अगदी अलिकडे 'थ्री इडियट्स, दंगल, अंधाधुंद, हिंदी मिडीयम' या सिनेमांनाही लोकप्रियता मिळाली आहे.
निरिक्षकांचे मते चिनी लोकांना "जिम्मी जिम्मी" वापरण्याचा एक स्मार्ट मार्ग सापडला आहे. त्याच्या माध्यमातून ते Zero-COVID policy च्या जाचक नियमांकडे लक्ष वेधत सौम्य निषेध जाहीर करत आहे. ही नवी पॉलिसी चीनी लोकांना जगापासून तोडत असल्याचं बोलत जात आहे.
राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांनी बंधनकारक केलेल्या Zero-COVID policy अंतर्गत, चीनी शहरे आणि परिसरांना कडक लॉकडाऊन पाळावी लागत आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यास परिसरातील लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवले जात आहे. बीजिंगसह चीन मधील सर्व शहरांमध्ये, नागरिकांना कोविड टेस्ट अनिवार्य आहे. नकारात्मक चाचणी परिणामांशिवाय, शहरातील लोक रेस्टॉरंट आणि बाजारपेठांसह सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत.