Lemon Viral Photo (PC - ANI)

Lemon Viral Photo: गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव 'आंबट' करत आहेत. लिंबाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या अनेक भागांत लिंबू (Lemon) 400 रुपये प्रतिकिलो भावाने विकले जात आहे. अनेक ठिकाणी एकच लिंबू 10 ते 15 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता लग्नातही लोक लिंबू भेट म्हणून देत आहेत.

गुजरातमधील राजकोटमधील धोराजी शहरात लग्न समारंभात लोकांनी वराला लिंबू गिफ्ट म्हणून दिले. आयुष्यातील सर्वात खास दिवशी वधू-वरांना लिंबू भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव दिनेश आहे. दिनेशच्या म्हणण्यानुसार, 'सध्या लिंबाच्या किमती संपूर्ण देशापेक्षा गुजरातमध्ये खूप वाढल्या आहेत. या उन्हाळ्यात लिंबाची खूप गरज असते. त्यामुळे खूप विचार करून हा निर्णय घेतला.' (हेही वाचा - लिंबू महाग झाल्याने वाईट नजरेपासून वाचण्यासाठी लोक मिरचीसोबत लटकवत आहेत लसूण; IPS अधिकाऱ्याने दिली मजेदार प्रतिक्रिया, See Viral Photo)

शहरातील मोनपरा कुटुंबातील मुलाच्या लग्न समारंभात मित्रांनी मिठाईच्या डब्यात पैसे किंवा दागिन्यांऐवजी महागडे लिंबू भेट दिले. लिंबूचे मूल्य इतके वाढले आहे की, ते आता महागडे गिफ्ट म्हणून दिले जाऊ शकते. ही खास भेट पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

लिंबूच्या वाढत्या दरामुळे सध्या बाजारात खळबळ उडाली आहे. भाजी मंडईतील दुकानदारांपासून ते आपल्या वस्तीजवळ आणि कार्यालयाजवळ लिंबू पाणी विकणारे विक्रेते लिंबूच्या वाढलेल्या दरामुळे हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लिंबू पिकाची चोरी झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.