लक्ष्मी अग्रवाल (Laxmi Agarwal) हे नाव आता सर्वाच्या परिचयाचे झाले आहे. अॅसिड हल्ल्यातून (Acid Attack) वाचलेल्या लक्ष्मीने खचून न जाता असंख्य पीडितांना प्रेरणा दिली. बॉलिवूडनेही लक्ष्मीच्या कामाची दखल घेतली असून अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 'छपाक' सिनेमात लक्ष्मीची संघर्षमय कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. लक्ष्मीने आपल्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर अॅसिडची खुली विक्री करण्यावर बंदी आणण्यासाठी योगदान दिले.
अॅसिड हल्यानंतर लक्ष्मीला अनेक संकटांना सामोर जावं लागलं. परंतु, लक्ष्मीने या सर्व समस्यांशी दोन हात केले. नुकताच 'छपाक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता लक्ष्मीने टीक टॉकवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. लक्ष्मीचा टीक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लक्ष्मी गाणं तसचं डान्स करताना दिसत आहे. लक्ष्मीला गाणं गायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अनेक टीक टॉक व्हिडिओमध्ये ती गाताना दिसत आहे. (हेही वाचा - Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी)
लक्ष्मीला आतापर्यंत सर्वांनी चॅनेलवर एखाद्या विषयावर डिबेट करताना पाहिलं आहे. परंतु, तिच्या रिअल लाइफमध्ये लक्ष्मी सर्व संकटाना बाजूला सारून कसं आनंदी जीवन जगत आहे दिसून येतं. लक्ष्मीचा मित्र नितिन सोनी याने thecurlypoet या अकाऊंटवरून लक्ष्मीसोबतचे Tik Tok व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओ अनेकांनी लाइक केले आहेत.
लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने लग्नाची मागणी घातली होती. परंतु, लक्ष्मी तेव्हा केवळ 16 वर्षाची होती. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला. यावेळी लग्नाची मागणी घालणाऱ्या व्यक्तीचे वय 31 वर्ष होते. लग्नाला नकार दिल्याने मैत्रिणीच्या भावाने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. त्यामुळे तिच्या चेहऱ्याची चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यानंतर तिच्या जीवनात अनेक समस्या आल्या. या समस्यांना लक्ष्मी कसं सामोरी गेली, हा सर्व प्रवास 'छपाक' सिनेमात पाहायला मिळणार आहे.