धक्कादायक: नशेत असलेल्या व्यक्तीने खाल्ला जिवंत साप; त्यानंतर 4 तासांत जे घडले...
नशेत असलेली व्यक्ती (Photo Credits: Etv Bharat UP YouTube)

नशेत असताना लोक काय करतील याचा काही भरवसा नाही. मारहाण, शिवीगाळ इथपर्यंत ठीक आहे. पण काहीवेळा नशेत असणारी व्यक्ती आपला जीवही धोक्यात घालू शकते. अशीच एक घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये घडली आहे, जिथे नशेत असताना एका व्यक्तीने चक्क जिवंत साप खाल्ला. नशेत असल्याने आपण नक्की काय करत आहोत हे या व्यक्तीला समजले नाही. त्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडू लागली, याला हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केले. क्षणभराची नशा या व्यक्तीला इतकी महागात पडली की, याला आपले प्राण गमवावे लागले.

उत्तर प्रदेशच्या अमरोहा (Amroha) इथे हा प्रकार घडला आहे. महिपाल असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचे वय 40 वर्षे होते. राज्जबपुरा इथला रहिवासी असलेला महिपाल नशेत चूर होऊन रस्त्याने चालत होता. त्याचवेळी त्याची नजर एका सापाच्या पिल्लावर पडली. नशेत असल्याने तो नेमका कोणता प्राणी आहे हे महिपालला समजले नाही, त्याने त्या सापाच्या पिल्लाला बोटाच्या चिमटीत पकडले. त्यानंतर त्याने त्या पिल्लाला हवेत खेळवण्याचा प्रयत्न केला, नंतर रस्त्यावर त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. महिपालचा हा चाललेला प्रताप पाहून आजूबाजूला लोक जमा झाले. त्यानंतर क्षणार्धात हा साप त्याच्या हातातून निसटून सरळ त्याच्या तोंडात निघून गेला. नक्की काय घडले हे समजायच्या आधीच महिपालने त्या सापाला गिळले होते. (हेही वाचा: भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त)

त्यानंतर महिपालची तब्येत बिघडू लागली. हे पाहून त्याच्या जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, जिथे 4 तासांमध्ये महिपालने आपले प्राण सोडले. हा साप महिपालच्या श्वासनलीकेमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिपालच्या माघारी त्याच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे.