मंगेश साबळे । YouTube

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका तरूण सरपंचाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळत असल्याचं पहायला मिळालं आहे. मंगेश साबळे (Mangesh Sable) असं या तरूण सरपंचाचं नाव असून फुलंब्री (Phulambri) येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील हा व्हिडिओ आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाच मागत असल्याने मंगेश साबळे यांनी 2 लाख रूपयांच्या नोटा उधळल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये त्याच्या गळ्यातही नोटांचा हार दिसत आहे.

शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्‍याच तालुक्यांमध्ये या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहे. फुलंब्री तालुक्यात मात्र अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावरूनच अधिकार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सरपंच मंगेश साबळे याने हा प्रकार केला आहे. त्याने नोट्या उधळत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत असल्याचा दावा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचा असल्याचा दावा केला होता. मात्र इथे शेतकऱ्यांकडेच लाच मागितली जात असल्याचा आरोप त्याने व्हिडिओत केला आहे. अशाप्रकारे मंगेश साबळे यांनी  अनोखं आंदोलन करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही देखील त्यांनी गावासाठी अशाप्रकारची आंदोलनं केली आहेत.  वीजप्रश्न सोडवण्यासाठी एकदा त्यांनी थेट महावितरणाच्या कार्यालयासमोर कपडे काढून आंदोलन केलं होते. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचं  सरपंच म्हणून ते प्रतिनिधित्त्व करतात.