Year Ender 2021: अनिल देशमुख यांच्या अटकेपासून ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यापर्यंत 'या' राजकीय घटनांनी गाजले महाविकास आघाडी सरकारचे यंदाचे वर्ष
Sharad Pawar, Sonia Gandhi, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

2021 वर्षे संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, अशात सर्वत्र या वर्षभराने आपल्याला काय दिले याबाबत चर्चा सुरु आहे. पूर्ण वर्ष जग कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या छायेखाली वावरले व आताही तीच परिस्थिती आहे. त्याचसोबत अनेक राजकीय घटना, वाद-विवादांनीही हे वर्ष गाजवले. महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युती सरकारसाठीदेखील हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. एकीकडे कोरोना विषाणू महामारी तर दुसरीकडे, मंत्र्यांवर झालेले आरोप, राजीनामे अशा अनेक गोष्टी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने पहिल्या. आज आपण अशाच काही महत्वाच्या घटना पाहणार आहोत.

वर्षाची सुरुवात व्यापारी मनसुख हिरेन यांच्या खळबळजनक हत्येने झाली. हिरेन यांच्या स्कार्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काठ्या आणि धमकीचे पत्र फेब्रुवारीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाच्या बाहेर सापडले होते. त्यानंतर काही दिवसांनी हिरेनचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा खाडीत सापडला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता.

अनिल देशमुख यांनी एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबईचे पोलीस प्रमुख परम बीर सिंग यांनी दावा केला होता की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांकडून दरमहा 100 कोटी रुपये उकळण्यास सांगितले होते. शिवसेनेचे संजय राठोड यांनी पुण्यातील एका महिलेच्या मृत्यूशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून, फेब्रुवारीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.

यंदा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2019 ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारलेले भाजप नेते विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यदिनाबाबत अज्ञानी असल्याचा दावा नारायण राणे केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील अनेक भागात सेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांच्या प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक खळबळजनक आरोप केले होते. आर्यनवर ड्रग्ज सेवन आणि वितरणाचा आरोप होता. मात्र, एजन्सी न्यायालयात आरोप सिद्ध करू शकली नाही आणि 26 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर वानखेडे यांच्यावर आर्यनचे खंडणीसाठी अपहरण केल्याचा आरोप केला. अनुसूचित जाती कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘काय यूपीए? आता यूपीए नाही. जे काही आहे ते आम्ही एकत्र ठरवू,’ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतल्यानंतर केलेली ही टिप्पणी, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या मुंबई भेटीचे मुख्य आकर्षण ठरली. यावेळी शरद पवार मात्र संयमी दिसले. ते म्हणाले की, ‘कोणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही. जे भाजपच्या विरोधात आहेत, त्यांचे स्वागत आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मुद्दा आहे.’

या दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ज्यांनी बॅनर्जी यांची त्यांच्या पक्षाचे राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईत भेट घेतली, त्यांनी नंतर दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली. (हेही वाचा: आशिष शेलार यांनी त्यांचे आरोप सिद्ध करावे, अन्यथा जाहीर माफी मागावी- Mayor Kishori Pednekar)

12 नोव्हेंबर रोजी पाठीची शस्त्रक्रिया झालेल्या उद्धव ठाकरे यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडवरून दोन कॅबिनेट बैठका आणि कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराच्या उदयाशी संबंधित बैठकांचे अध्यक्षपद भूषवले.

या वर्षी अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार एमएलसी निवडणुकीत पराभूत झाले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपकडून पराभव झाला, तर देगलूर विधानसभेची जागा काँग्रेसने राखली. विद्यमान आमदारांचे कोविड-19 मुळे निधन झाल्याने दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ आमदार असलेले आणि शेतकरी आणि कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूपी) ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे 31 जुलै रोजी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे 16 मे रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी निधन झाले.

वर्ष संपत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 19 डिसेंबर रोजी पुण्याचा दौरा केला. यावेळी बोलताना राज्याच्या महाविकास आघाडी सरकारची तुलना त्यांनी ऑटोरिक्षाशी केली. ‘ऑटोरिक्षाची तीन चाके (तीन पक्ष) वेगवेगळ्या दिशांना असतात आणि पंक्चर झाल्यामुळे ते हलू शकत नाहीत. त्यामुळे फक्त धूर निघतो आणि प्रदूषण वाढते,’ असे शहा म्हणाले. शिवसेनेवर निशाणा साधत शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी ‘हिंदुत्वाचा विश्वासघात’ केल्याचा ठपका ठेवला.

कोरोनाची दुसरी लाट राज्यासाठी डोकेदुखी ठरली. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात नोंदवले गेले. वर्षाच्या अखेरीस, कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनचे  सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात दिसून येत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्ष घरीच साजरे करण्याचे आवाहन बीएमसीच्या लोकांनी केले आहे.

महाराष्ट्राने 2021 मध्ये चक्रीवादळासह कोकणातील पुराचा सामना केला. यासह 28 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एमएसआरटीसीच्या बससेवेवर परिणाम होत आहे. संपात सहभागी झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फही करण्यात आले आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळेही सरकारवर ताशेरे ओढले गेले.

तर अशाप्रकारे अनेक भाजप नेते उद्धव ठाकरे सरकार पडेल असे भाकीत वर्तवत राहिले. काहींनी सरकार पडण्याच्या ठराविक तारखाही दिल्या. परंतु शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष एकमेकांसोबत खंबीर उभे असलेले दिसले.