यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळं नाल्याला आलेल्या पुरामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. राळेगाव, मेंगापूर, वाऱ्हा, बोरी, आष्टा या भागातील शेतातून पूराचं पाणी गेल्यानं अंदाजे 200 हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तुरीचे पीक जलमय झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने आनंद नगर परिसरात पाणी शिरलं आहे. पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकले.पावसाचा जोर कायम असल्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. महागांव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायत मधील आनंद नगर येथील चाळीस नागरिक बेटावर अडकले आहेत. (हेही वाचा -Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद)
यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळं शेती पिकांचेही नुकसान झालं आहे. जमिनीही खरडून गेल्या आहेत. दरवर्षी शेतकरी राळेगावमधील नाल्याचे सरळीकरण करण्याची मागणी करतात. मात्र, याकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ही परिस्थिती ओढवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वाऱ्हा आणि बोरी मेंगापूर पुलावरून पाणी गेल्याने संपूर्ण शिवार जलमय झाला आहे. याठिकाणी नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याचे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.