Yavatmal: लपलेला खजिना मिळवण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; आरोपी बापासह तांत्रिक व 7 जणांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

21 व्या शतकातही अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात दडलेला खजिना (Hidden Treasure) मिळवण्याच्या उद्देशाने 18 वर्षीय मुलीचा मानवी बळी देऊन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. बाभूळगाव तालुक्यात सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पीडितेचे वडील, तांत्रिक आणि इतर सात जणांना अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले की, आरोपीला दोन मुली आहेत. त्याने यांचे लैंगिक शोषण केले आणि मोठ्या मुलीला धमकावले. ही मुलगी शिक्षणासाठी नातेवाईकाच्या घरी राहत होती. ती नुकतीच तिच्या गावी परत आली होती. खजिना मिळवण्याच्या उद्देशाने आरोपीने गेल्या काही दिवसांपासून घरी तांत्रिक विधी करण्यास सुरुवात केली होती. 25 एप्रिल रोजी आपल्या मुलीला पुरण्यासाठी त्याने घरात खड्डा खणला होता.

जेव्हा पीडित मुलीला या प्रकाराबद्दल समजले तेव्हा तिने कसेतरी तिच्या मित्राला या विधीबद्दल माहिती दिली. त्यानंतर या मित्राने पोलिसांना सतर्क केले. पुढे पोलीस घटनास्थळी पोहचून हा प्रकार थांबवण्यात आला. या संदर्भात कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 376 (बलात्कार) आणि आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदी आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा: अमरावती येथे अंधश्रद्धेचा बळी, तांत्रिकाने मुलाच्या पोटावर दिले लोखंडाच्या गरम रॉडचे चटके)

दरम्यान याआधी झारखंडमध्ये एका कथित तांत्रिक महिलेने आपल्याकडे आलेल्या महिलेच्या शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासाठी चक्क तिच्यावर त्रिशुळाने वार केला. इतकेच नव्हे तर हेच त्रिशूळ तिच्या शरीरात भोकसून महिलेचे डोळे आणि नाक देखील फोडले. शरीरावरील या अत्याचाराने महिलेचा जागीच मृत्यू झाला.