यवतमाळ: बिबट्याविरुद्ध 19 वर्षीय मुलीने दाखवली हिंमत; बादलीच्या साहाय्याने प्रतिकार करत वाचवला स्वत:चा जीव
Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड (Karanjkhed) गावात सोमवारी दुपारी 19 वर्षीय तरुणीने बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याला धाडसाने परतवून लावले. या हल्ल्यात मुलीला खोलवर जखमा झाल्या असल्या तरी तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या तरुणीचे नाव वृषाली नीलकंदराव ठाकरे असे असून ती पुसद येथील महाविद्यालयात फार्मसीचा अभ्यास करत आहे.

वृषाली सोमवारी सकाळी गावातील शेतात कापूस वेचण्यासाठी आई आणि इतर काही जणांसोबत गेली होती. दुपारी ती आईसाठी पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली. ती विहिरीतून पाणी काढताना शेजारी लपून बसलेल्या एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. मात्र हिंमत न गमावता वृषालीने स्वतःचा बचाव करण्यासाठी हातातली बादली वापरली आणि बिबट्याला मारायला सुरुवात केली. तसंच तिने आरडाओरड देखील सुरु केली. तिचा आवाज ऐकून इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्याने तिच्या अंगावर खोल जखमा केल्या होत्या.

इतर लोक घटनास्थळी पोहोचताच बिबट्या जंगलात पळून गेला. जखमी वृषालीला सुरुवातीला शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर यवतमाळच्या जीएमसीएच रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. (Leopard Attack: आरे येथे 14 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, एकाच महिन्यातील सहावी घटना)

ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनाधिकारी हेमंत उबाळे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर वृषालीला आर्थिक मदत दिली जाईल, असे उबाळे यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका बछड्याला मारून खाऊन टाकल्याची माहितीही ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिली. या घटनेमुळे गावकरी आता घाबरले असून ते आपापल्या शेतात जाण्यास तयार नाहीत. वन्य प्राण्यांपासून त्यांचे प्राण आणि मालमत्ता वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.