Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सैन्य प्रशिक्षणादरम्यान जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नल यश गोरख महाले (Yash Gorakh Mahale)  याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव (Jalgaon)  मधील चाळीसगाव (Chalisgaon)  तालुक्यात यशचं घर होतं. त्याच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार झाले आहेत. यश नुकताच भारतीय सैन्यामध्ये भरती झाला होता. रितीनुसार भरतीनंतर त्याचं पुण्याच्या खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देखील सुरू झाले. पण बॉक्सिंग खेळताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामध्येच त्याचा करूण अंत झाला. पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते.

यश गोरख महालेवर त्याच्या मूळ गावी म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. सैन्यदलामध्ये भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदावर जाण्याची स्वप्न पाहणार्‍या यशच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

'सैन्यात शत्रूशी लढताना शहीद झाला असता तर अभिमान वाटला असता. मात्र एवढी खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत आहे.' अशी प्रतिक्रिया यशच्या मामाने बोलताना दिली आहे. यशला तर आम्ही गमावले आहे. परंतु अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना करावी अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली आहे.