Kishori Pednekar | Twitter

मुंबईत याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीवरून राजकारण पेटलं असताना आरोप-प्रत्यारोपाच्या पुन्हा फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या याकूबचा भाऊ रऊफ मेमन सोबत चर्चा करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर आज आता त्या आरोपांना उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेननची भेट राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांनी देखील घेतल्याचा दावा केला आहे. त्याबाबतचे फोटो मीडीयासमोर शेअर केले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो शेअर करताना ही मंडळी संविधानिक पदावर बसलेली आहेत. त्यांच्याकडे कामासाठी कुणीही येऊ शकतं. रऊफ यांच्या कपाळावर 'गुन्हेगारा'चा शिक्का नाही. त्यामुळे जसा यांचा मेनन सोबत संबंध नाही तसाच तो उद्धव ठाकरेंचा देखील नाही. काम करणार्‍या व्यक्तींच्या मागे असे आरोप लावणं भाजपने बंद करावं असा सज्जड इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. माझ्या कामावर आक्षेप असेल तर मला सांगा. असेही त्या म्हणाल्या आहेत.

किशोरी पेडणेकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी कब्रिस्तानाला खास भेट दिली नव्हती. त्या सगळ्या धार्मिक स्थळांना भेट देत होत्या. त्यात हेही एक धार्मिक स्थळ होतं. राज पुरोहिताचा मुलगा आकाश पुरोहित हा देखील होता. तिथल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करायला गेलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जे बदनामीचं षडयंत्र तुम्ही करत आहात, त्या चिखलात तुम्हीच पडणार आहात असेही त्यांनी भाजापाला ठणकावून सांगितलं आहे.