
पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून 29 आणि 30 मार्च दरम्यान रात्रीचा ब्लॉक (Night Block ) जाहीर करण्यात आला आहे. ट्रॅकच्या देखभालीचं काम, सिग्नलिंग, ओव्हरहेड वायर्सच्या कामासाठी हा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. येत्या शनिवार/रविवार रात्रीच्या वेळी सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान, डाऊन स्लो मार्गावर पहाटे 1 ते 4.30 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल, तर अप स्लो मार्गावर पहाटे 12.30 ते 4.30 वाजेपर्यंत 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक दरम्यान मुंबई सेंट्रल (लोकल) आणि सांताक्रूझ दरम्यान डाऊन स्लो मार्गावरील गाड्या डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. यामुळे, प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने, लोकल गाड्या लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दोनदा थांबतील. प्लॅटफॉर्मअभावी या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.
पश्चिम रेल्वे वर डाऊनप्रमाणे, सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल (लोकल)/चर्चगेट पर्यंत अप फास्ट मार्गावर अप स्लो मार्गाच्या गाड्या चालवल्या जातील. त्यामुळे, प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने या गाड्या खार रोड स्थानकावर दोनदा थांबवल्या जातील. प्लॅटफॉर्मअभावी या गाड्या माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत. नक्की वाचा: Kalyan Badlapur Power Block: कल्याण बदलापूर दरम्यान 29-30 मार्चला पॉवर ब्लॉक; पहा कोणकोणत्या ट्रेन मध्ये होणार बदल .
पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकची माहिती घेऊन प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची आखणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे रविवार, 30 मार्च 2025 रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसाचा कोणताही ब्लॉक नसेल.