Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

मृत्यू आणि त्यानंतरचे संस्कार याला देखील हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ट महत्त्व असते. आजकाल कामा निमित्त देशा-परदेशात राहणारी मुलं आणि एकटी राहणारी वयोवृद्ध मंडळी, अंथरूणाळा खिळलेले रूग्ण, मूलबाळ नसलेल्या व्यक्ती अशांच्या अंतिम संस्कारांमध्ये हेळसांड नको यामधून एकाने आपला व्यवासाय सुरू केला आहे. सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रा. लि. (Sukhant Funeral Management Pvt Ltd) यासाठी काम करणार आहेत. त्यांच्याकडून निराधारांच्या अंत्यसंस्काराचे कंत्राट घेतले जातात. संजय रामगुडे (Sanjay Ramgude) यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.

संजय रामगुडे यांच्या दाव्यानुसार या चिंतामुक्त अंत्यसंस्कारातून 50 लाखांची उलाढाल झाली आहे. आणि भविष्यातील बदलती जीवनशैली पाहता त्यामध्ये 2000 कोटींवर त्याची उलाढाल जाऊ शकते. या कंपनीमध्ये संजय रामगुडे यांच्यासोबत 20 कर्मचारी काम करत आहेत. नक्की वाचा: Akola Shocker: अंत्यविधीला नेत असताना 25 वर्षीय तरूण तिरडीवर उठून बसला अन गप्पा मारायला लागला; सारेच चकीत.

संजय रामगुडे हे सिनेसृष्टीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत होते. काही वर्षांपूर्वी शूटिंगनिमित्ताने ते वाराणसी मध्ये गेले असता, घाटावर सुरू असलेल्या मरणोत्तर विधींनी त्यांचे लक्ष वेधले. यामधून त्यांना नव्या कंपनीची कल्पना सुचली. ही कंपनी 8 वर्षांपासून काम करत आहे. सध्या भारतामध्ये अशी काम करणारी ही एकमेव कंपनी आहे.

नातलगाचं निधन झाल्याची माहिती मिळते पण विधींसाठी माणसं मिळत नाही. अशामध्ये रामगुडे यांच्या कंपनीकडे संपर्क किंवा नोंदणी केलेल्यांना तासाभरात पुढील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तिरडी बांधण्यापासून स्मशानभूमीत नाव नोंदणी ते मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना ही सारी कामं केली जातात.

मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार नीट व्हावेत यासाठी आतापर्यंत 1500 लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेत 5 लाख मेंबर्सचा टप्पा गाठण्याचा मानस असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. तर 2000 कोटींच्या उलाढालीचं लक्ष्य आहे. कोरोना काळात त्यांनी 260 जणांचे अंत्यसंस्कार केले आहेत.

जर आधीच बुकिंग करून सर्व सुविधांसाठी मेंबर झाले असाल तर 37,700 रूपये आकारले जातात आणि फक्त अंत्यसंस्कारासाठी टीम बोलावली, तर 8.5 ते 12.5 हजारांपर्यंत खर्च येत आल्याचं त्यांनी सांगितले आहे.