घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू हे मोठं संकट असतं. पण अकोलाच्या पातूर तालुक्यातील विवरा मध्ये घडलेली घटना ही आश्चर्याची बाब आहे. 25 वर्षीय तरूण तिरडीवरून अंत्यसंस्काराला घेऊन जाताना अचानक उठून बसल्याची घटना समोर आली आणि सार्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्ट नुसार, हा व्यक्ती केवळ तिरडीवर उठून बसला नाही तर चक्क तो गप्पा देखील मारत होता.
प्रशांत मेसरे असं या तरूणाचं नावं आहे. 25 वर्षीय प्रशांत होमगार्ड मध्ये नोकरीला होता. मागील काही दिवस तो आजारी होता. आजारी प्रशांतला हॉस्पिटल मध्ये दाखल देखील करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. अवघा 25 वर्षाचा मुलगा अकाली गेल्याने गावात शोक व्यक्त केला जात होता. अंत्यविधी करून स्मशानात घेऊन जाताना अचानक तो उठून बसला. दरम्यान त्याच्याकडे दैवी शक्ती असल्यानेच हा चमत्कार झाला असल्याची गावात चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या माहितीनुसार त्याच्या अंगात येत होतं. त्यामुळे हा एक चमत्कार असल्याचं त्यांची धारणा झाली आहे.
सध्या प्रशांतला एका मंदिरामध्ये ठेवण्यात आलं आहे. तेथे त्याला बघायला मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिस देखील दाखल झाले आहेत.