Beed Collector office: आंदोलन स्थळी महिला बाळंत, बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना
Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

आंदोलन सुरु असताना आंदोलनस्थळीच एका महिलेची प्रसुती झाली आहे. बीड जिल्हाधिकारी (Beed Collector office) कार्यालय परिसरात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, मनीषा विकास काळे ही गर्भवती महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला (Woman on Fasting) बसल्या होत्या. आंदोलन सुर असतानाच पहाटेच्या सुमरास त्यांना बाळंतकळा सुरु झाल्या. उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास त्यांनी नकार दिला. अखेर त्यांची आंदोलनस्थळीच प्रसुती झाली.

प्राप्त माहितीनुसार, बाळंत झालेली महिला पारधी समाजातील आहे. ही महिला आणि तिचे पती आप्पाराव पवार यांच्यासोबत बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात राहतात. आप्पाराव पवार यांना अप्पाराव यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झाले आहे. मात्र, त्यांना घर बांधण्यासाठी जागाच नाही. त्यातच ग्रामपंचायतही त्यांना घर बांधण्यासाठी जागा देत नाही. त्यामुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, न्याय मिळविण्यासाठी हे सर्वजण बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. 24 जानेवारीपासून मनीषा काळे या कुटुंबियांसोबत उपोषणाला बसल्या आहेत. हे सर्वजण उपोषणाला बसले असतानाच मनिषा काळे प्रसुती झाली. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, वरळी: मुंबई पोलिसांच्या गाडीत महिलेची प्रसुती; पोलिसांच्या प्रसंगावधामुळे वाचले आई आणि बाळाचे प्राण)

दरम्यान, आंदोलन स्थळीच महिलेची प्रसुती होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हवी तशी कार्यवाही केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची या तक्रारीवर भूमिका समजू शकली नाही. मात्र, अप्पाराव पवार यांना घर मिळावे अशी भावाना काही नागरिक व्यक्त करत आहेत.