Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मित्राच्या वाढदिवसासाठी नवी सांगवी ते कोरेगाव पार्क येथे जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांतील एका तरुणीचा (Pune Young Woman) तिच्या ओला कॅब (Ola Cab) चालकाने विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. सीएनजी संपल्याच्या बहाण्याने चालकाने त्याची कार देहू रोडकडे वळवली आणि निर्जन ठिकाणी तिचा विनयभंग (Woman Molested By Ola Cab Driver) केला असा आरोपी पीडितेने केला आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना 14 मे रोजी घडली. दरम्यान, स्वसंरक्षणार्थ पीडित महिला घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरली. दरम्यान, एका रिक्षाचालकाची मदत मिळाली, ज्याने तिला सुखरूप घरी आणले. दुभाषाच्या मदतीने तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे चालक राहुल मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीएनजीच्या बहाण्याने कार देहू रोडच्या दिशेने वळवली

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सांगवी येथे राहणारी ही महिला सांगवी, औंध, खडकी मार्गे कोरेगाव पार्कला जात होती. तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याच्या अवघ्या सात मिनिटांपूर्वी, ओला चालक मस्के यांनी कारला इंधन भरण्याची गरज असल्याचा दावा केला आणि कार देहू रोडच्या दिशेने वळवली. मार्ग बदलल्याचा अंदाज आल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने महिलेने चालकाला प्रश्न केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. ज्यामुळे तिचा विनयभंग झाला. सुरुवातीपासून कोरेगाव पार्कशी परिचीत असलेली महिला देहू रोड या अनोळखी रस्त्याला आल्याने घाबरली. तिने गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. देहू रोड कॅन्टोन्मेंट परिसरात चालक मस्के यांने कॅब थांबवली आणि तिचा विनयभंग सुरू केला. घाबरलेली महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आणि रस्त्याने पळाली. (हेही वाचा, ठाणे: झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडून दोन महिलांचा विनयभंग)

रिक्षाचालकाकडून मदत

पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने सांगितले की, सोमाटणे टोल प्लाझाजवळील रहदारी आणि पथदिवे यामुळे मस्केने तिचा पाठलाग केला नाही. पहाटे 2 च्या सुमारास एका रिक्षाचालकाने ती संकटात असल्याचे ओळखले आणि तिला मदतीचा हात पुढे केला. तिला रिक्षात घेतले आणि सांगवी येथे नेले, जिथे ती सुखरूप घरी पोहोचली.

दुभाषाची मदत

दुसऱ्या दिवशी दुपारी हिंदी आणि इंग्रजी समजणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने पीडित तरुणी पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार देण्यासाठी परतली. सांगवी पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांनी तिला घडलेली घटना कथन करण्यासाठी प्रोत्साहित केले. सांगवी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. ही घटना देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण तिकडे वर्ग करण्यात आले. अधिकारी सध्या संबंधित कॅब चालकाचा शोध घेत आहेत.

एक्स पोस्ट

भाषेचा अडथळा

पीडितेचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील मर्यादित प्रभुत्वामुळे संवादाचे आव्हान उभे राहिले. तिने ही घटना तिच्या मूळ भाषेत एका दुभाष्याला सांगितली, त्याने सांगवी पोलिसांसाठी त्याचे भाषांतर केले. यामुळे घटनेचे सर्वसमावेशक आकलन सुलभ झाले, तिला भाषेच्या अडथळ्याला न जुमानता प्रभावीपणे अहवाल देण्याची परवानगी दिली. पीडितेने दिलेली माहिती आणि तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी सांगवी पोलीस अधिकारी पीडितेसोबत तिने सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी गेले. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण देहू रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे, असे सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.