Maharashtra Weather Updates: मुंबई सह मध्य महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत थंडी परतण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Winter 2020 (Photo Credits: IANS)

Mumbai Winter 2020  Updates:  महाराष्ट्रामध्ये मागील 10-15 दिवसांपासून गायब झालेली थंडी येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा परतण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा पारा खाली जाण्याची शक्यता आहे. तर आज महाराष्ट्रात कोकण, विदर्भ सोबतच उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये तापमान 15 अंशापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीवर तापमान 18-20 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान 15 अंशापेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबई सह महाराष्ट्रातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता दाट आहे.

आज (28 जानेवारी) पहाटे मुंबई शहरामध्ये तापमान 16-18 अंश इतके नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आज मुंबई शहरामध्ये हवामान प्रसन्न आहे. परंतू येत्या काही दिवसामध्ये हवामान अजून खालावण्याची शक्यता आहे. आज पुणे शहरामध्ये किमान तापमान 15.6 अंश, मुंबईतील सांताक्रुझमध्ये 19.2 अंश, नाशिकमध्ये 14.5 अंश तर औरंगाबादमध्ये 16.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कशी आहे हवामानाची स्थिती?

महाराष्ट्रात यंदा सुरूवातीला मान्सून रेंगाळला त्या पाठोपाठ थंडीचं आगमनदेखील लांबलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 17 जानेवारीच्या सकाळी मुंबई शहरामध्ये 2013 सालानंतर सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्या दिवशी सकाळी तापमान 11 अंशापर्यंत खाली गेल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली होती.