Satyajeet Tambe | Twitter

नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या जागेवरून कॉंग्रेस मधील मनमुटाव चव्हाट्यावर आले. अपक्ष म्हणून सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) निवडणूक लढून जिंकून आल्यानंतर त्यांचे मामा आणि माजी कॉंग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही राजीनामा दिला. पण या राजीनामानाट्यानंतर दिल्लीत पुन्हा हालचालींंना वेग आला आहे. काल बाळासाहेब थोरातांनी भर सभेत बोलताना सत्यजितच पक्ष विरूद्ध अपक्ष किती चालतंय हे बघू. तुझ्याशिवाय कॉंग्रेसला आणि कॉंग्रेस मधील तुझ्या टीमला कसं करमणार असं म्हणत त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले. पण आज सत्यजित तांबे यांनी चारोळी ट्वीट केली आहे. सत्यजित तांबे यांचं हे ट्वीट आता चर्चेत आले आहे. आपल्याला  'क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द' असल्याच्या आशयाच्या या चार ओळी असल्याने उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

दरम्यान नाशिक पदवीधरच्या निवडणूकी साठी कॉंग्रेस ने डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची दिल्लीतून घोषणा केली. सुधीर तांबे इच्छूक नसून देखील  ते नाव घोषित झाले. त्यानंतर चूकीचा एबी फॉर्म आल्याने नाराज सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. या गोष्टीवरून कॉंग्रेसने तांबे पितापुत्रांचे पक्षातून निलंबन केले. निवडणूक निकालानंतर सत्यजित तांबे यांनी आपली बाजू मीडीयासमोर ठेवली. त्यानंतर त्यांचे मामा आणि माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही विधिमंडळातील कॉंग्रेस गटनेते पदाचा राजीनामा दिला.  बाळासाहेबांच्या राजीनामा नाट्यानंतर पुन्हा दिल्लीतून सूत्र हलण्यास सुरूवात झाल्याचं बाळासाहेब यांनी काल संगमनेरच्या सभेत म्हटलं आहे. बाळासाहेबांकडून सत्यजितच्या मनधरणीचे आणि कॉंग्रेस पक्षात परतण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न दिसून येत आहेत.

सत्यजित तांबे यांचं ट्वीट  

सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर ते पुढे काय भूमिका घेणार? याकडे  अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष राहूनच काम करणार असल्याचं जाहीर केले आहे. पण तांबे-थोरात यांच्या कॉंग्रेस मधील नाराजीनाट्यानंतर भाजपा त्यांना गळाला लावणार का? अशी देखील चर्चा आहे. भाजपाकडूनही आपल्या पक्षाचे  दरवाजे कायम उघडे असल्याचं म्हटलं होते. त्यामुळे आता सत्यजित पुढे राजकीय भूमिका काय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.