एकनाथ खडसे भाजप सोडणार? राजकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse | (Photo courtesy: archived, edited images)

जळगावच्या (Jalgaon) राजकारणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) या एकेकाळच्या गुरुशिष्याच्या नात्यात अंतर निर्माण झाले असून सध्या दोघेही नेते परस्परांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाहीत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उडी घेतली आहे. यासाठी नुकतीच जळगाव येथे भाजपची विभागीय समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, भाजपमधील काही नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहेत. जर पक्षात अशाच प्रकार सुरु राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. यामुळे एकनाथ खडसे पक्ष सोडणार का? असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहणी खडसे यांच्या पराभावामागे भाजपच्या काही नेत्यांचा हात असल्याचा दावा खडसे यांनी काहीदिवसांपूर्वी केला होता. यावर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान देत बिनधास्तपणे त्या नेत्यांची नावे जाहीर करावे, असे विधान केले होते. जर प्रदेशाध्यशांनी परवानगी दिल्यास पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करेल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे. परिणामी, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत खडसे आणि महाजन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी भाजपची जळगाव येथे विभागीय समितीची बैठक बोलावली होती. हे देखील वाचा- '...तर पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करेल' एकनाथ खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांना इशारा

दरम्यान, भाजप विभागीय समितीची बैठक संपल्यानंतर एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद पार पडली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रोहणी खडसे यांना भाजपच्या नेत्यांनीच पाडले असून या संदर्भातील सर्व पुरावे चंद्रकांत पाटील यांना सपूर्त केले असल्याचे खडसे म्हणाले आहेत. तसेच माझ्यावर असाच अन्याय अत्याचार होत राहिल्यास मी वेगळा विचार करेल, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.