मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने औरंगाबाद येथील एका पुरुषाला एका विचित्र कारणामुळे पत्नीला घटस्फोट देण्याची परवानगी दिली. या व्यक्तीच्या पत्नीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यापूर्वीच तिच्या दुसऱ्या लग्नासाठी तिचे प्रोफाईल दोन मेट्रोमोनियल वेबसाईटवर अपलोड केले होते. अकोल्यातील कौटुंबिक न्यायालयात दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. तिच्या प्रोफाइलमध्ये महिलेने 'घटस्फोटाच्या निकालाची प्रतीक्षा' असे लिहिले आहे. न्यायमूर्ती एएस चंदूकर आणि न्यायमूर्ती जीए स्नॅप यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात असे म्हटले आहे की, मेट्रोमोनियल वेबसाइटवर प्रोफाईल अपलोड केल्याचा स्पष्ट अर्थ आहे की महिलेने तिच्या पतीपासून घटस्फोटाचा विचार केला आहे.
अशाप्रकारे घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित असतानाही दोन वैवाहिक साइटवर तिचे प्रोफाइल तयार करून दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली. याची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याला पतीवरील मानसिक क्रूरता म्हणून संबोधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघे पणजीममध्ये राहू लागले. पण काही दिवसांनी त्या महिलेने या ठिकाणी आपल्याला ठीक वाटत नाही अशी तक्रार करायला सुरुवात केली. महिलेने पतीवर नोकरी सोडून अकोल्यात शिफ्ट होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. जेव्हा पतीने यासाठी नकार दिला तेव्हा दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. लग्नाच्या सुमारे नऊ महिन्यांनंतर, महिलेने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पणजी सोडले. (हेही वाचा: Bihar: मित्रांसोबत सेक्स करण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर ब्लेडने हल्ला, पती विरोधात गुन्हा दाखल)
काही दिवसांनी तिने आपले सर्व सामानही आपल्यासोबत नेले. यानंतर, पतीला घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अपील करावे लागले. 7 डिसेंबर 2020 रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली, पण दोघांना स्वतंत्रपणे राहण्याची परवानगी मिळाली. यानंतर, पतीने घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर त्याला शुक्रवारी न्यायालयाकडून घटस्फोटासाठी मंजुरी मिळाली. महिलेने न्यायालयात आरोप केला होता की, तिच्याकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती आणि हुंडा न दिल्याने तिला तिच्या सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात होता.