Uddhav Thackeray: सीएमओ ट्विटर हॅण्डलवरून संभाजीनगर असा उल्लेख का करण्यात आला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Name Change) मुद्दा चांगलाच पेटला आहे. शिवसेना (Shiv Sena) गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याची मागणी करत आहे. मात्र, महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसने (Congrees) याला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. यातच 6 जानेवारी 2020 पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. ज्यामुळे अधिक वाद निर्माण झाला. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे.

सीएमओ ट्विटर हॅण्डलवरून संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ते म्हणाले की, यात मी नवीन काहीच केले नाही. जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केले आहे आणि तेच स्वीकारणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- NCP Party Fund: सत्तेवर येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनिधीत पाचपट वाढ, कॉर्पोरेट कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांची मदत, निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रितिक्रिया आलेली नाही. मात्र, सीएमओ ट्विटर हॅण्डलवरून संभाजीनगर असे उल्लेख करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, अशा इशाराच बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.