Tanaji Sawant on Aditya Thackeray: कोण आदित्य ठाकरे? एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा सवाल
Tanaji Sawant on Aditya Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोण आदित्य ठाकरे? मी त्यांना ओळखत नाही. त्यांच्याकडे केवळ एक आमदार आहे. त्यापलीकडे त्यांची ओळख नाही. त्यांचे कर्तृत्व ते काय? असा सवालच तानाजी सावंत (Tanaji Sawant on Aditya Thackeray) यांनी विचारला आहे. शिंदे गटातील आमदाराने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर नाव घेऊन थेट टीका करत आव्हान दिले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोणत्याप्रकारे प्रतिक्रिया येते याबाब उत्सुकता आहे.

आदित्य ठाकरे आज पुण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा आज पुण्यात असणार आहे. दोन्ही नेते एकाच शहरात असणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होणार यात काहीच आश्चर्य नाही. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी नंतर महाराष्ट्र पींजून काढत आहेत. खास करुन ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा, रॅली आणि मेळावे घेत आहेत. त्याला प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे. (हेही वाचा, Saamana Editorial on Sanjay Raut ED Arrests: संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामन संपादकीयातून विरोधकांवर टीकास्त्र)

तानाजी सावंत यांच्याशी लढण्याची कोणाची तागत नाही. ज्या लोकांनी माझे पुण्यातील कार्यालय फोडले ते चार दोन लोक होते. त्यांना आपण कोणाशी पंगा घेतो आहोत याची कल्पना नाही. ज्या लोकांनी माझ्या कार्यालयावर दगड फेकला ते शिवसैनिक नव्हते. त्यांच्याकडे शिवसैनिक राहिलेच नाहीत. शिवसैनिकांप्रमाणे भगवी उपरणी घालून आलेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते, असा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर तीखट प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व हेच आदित्य ठाकरे यांचे कर्तृत्व आहे. मातोश्री, उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्यावर बोलाल तर याद राखा असा ईशाराही चंद्रकांत खैरे यांनी सावंतांना दिला आहे.