Nawab Malik on Parambir Singh: सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही त्यांचा बचाव केला आहे. तसेच अनिल देशमुख यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर पोलिसांना भेटण्यासंदर्भात आणि पत्रकार परिषद घेण्याच्या भाजपच्या दाव्याला नवाब मलिक यांनी नकार दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अनिल देशमुख महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत आणि अशी मागणी करण्याचा भाजपला कोणतेही नैतिक आधार नाही. नवाब मलिक पुढे म्हणाले, 'एका आयपीएस अधिकाऱ्याने तत्कालीन गृहमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यावर काही गंभीर आरोप केले. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता का? अशा गोष्टी बोलण्याचे कोणतेही नैतिक आधार भाजपाकडे नाहीत. भाजपाने प्रथम आपला भूतकाळ पहावा. खोट्या आरोपावरून कोणी राजीनामा देत नाही.'
देशमुख यांची बाजू मांडताना मलिक यांनी सांगितले की, अनिल देशमुख कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर क्वारंटाईन काळात कोणत्याही अधिकाऱ्याला भेटले नव्हते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते चार्टर्ड प्लेनहून मुंबईला आले आणि त्यांना स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलं होतं. त्यांचा क्वारंटाईन काळावधी 27 फेब्रुवारीपर्यंत होता. 27 फेब्रुवारीपर्यंत ते कोणालाही भेटले नाही. (वाचा - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाची लागण ते कोरोनामुक्ती पर्यंतची माहिती देत मीडियातील काही खोट्या वृत्तांना फेटाळलं Watch Video)
देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार असा दावा करत आहेत की, अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, हे पूर्णपणे असत्य आहे. 15 फेब्रुवारीला जेव्हा देशमुख यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तेव्हा त्यावेळी रुग्णालयाबाहेर काही पत्रकार होते. यावेळी पत्रकारांनी अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारले. मात्र, देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एक खुर्ची घेऊन त्याठिकाणी बसले.
परमबीर सिंग यांची बदली झाली तेव्हापासून ते वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. ते असं का करीत आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. ते दिल्लीला गेले, तिथे परबीर सिंह कोणाशी भेटले, तेथे त्यांना काय सांगितलं गेलं, याबद्दल आम्हाला सर्व काही माहित आहे. आम्ही तुम्हाला योग्य वेळी सर्व सांगू. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि योग्य वेळी सर्व काही सांगितले जाईल. अधिकाऱ्यांची बदली करणे हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा प्रशासकीय निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आणि न्याय मिळवण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. तिथे त्यांना काय न्याय मिळतो हे आम्ही पाहू.
एनआयए आणि एटीएसची चौकशी सुरू -
अँटिलीया प्रकरण आणि मुनसुख हिरेन यांच्या मृत्यूविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले, एनआयए आणि एटीएस या दोन एजन्सीमार्फत या गंभीर प्रकरणांची चौकशी सुरू आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. काही लोकांनी फसवणूक केली आहे. ते लपविण्यासाठी एका माणसाला मारण्यात आले. त्यात कोण सहभागी आहे हे आम्ही पाहू. हे सर्व आरोप केवळ या महत्त्वपूर्ण फसवणूकीच्या प्रकरणांकडे लक्ष हटविण्यासाठी आहेत. ही फसवणूक कोणाच्या आदेशावरून झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते का केले गेले? खटला लपवण्यासाठी मनसुख हिरेनची हत्या का केली गेली? या सर्वामागे कोण आहे? ही या प्रकरणातील सर्वात महत्वाची बाब आहे. एनआयए आणि एटीएस या प्रकरणाची चौकशी करत आहे. चौकशीनंतर सर्व काही सत्य बाहेर येईल.