Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्रात होत असल्याचे सांगितले जात आहे. सोशल डिस्टंसिंग न पाळणे, मास्क न लावणे या गोष्टींमुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या (COVID-19 Cases) वाढत आहे. मात्र अशी परिस्थिती अन्य राज्यातही पाहायला मिळत आहे. त्यात "पश्चिम बंगालमधील मेळाव्यात आणि उत्तर प्रदेशातील व अन्य राज्यातील धार्मिक स्थळांवर देखील हिच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मग असा राज्यांत कोरोनाचा फैलाव होत नाही का?" असा सवाल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केला आहे.

"एकट्या महाराष्ट्रातच कोविड केसेस वाढत आहे का" असा सवालही अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे. "महाराष्ट्र या देशाबाहेर आहे काय याची मला शंका आहे. "जेव्हा कधी समाजात व्हायरस पसरतो, तो फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येच दिसून येतो. इतर राज्यात काय त्याचा प्रभाव दिसून येत नाही का?" असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- KDMC: कल्याण-डोंबिवलीतील सर्व दुकाने शनिवारी-रविवारी राहणार बंद; केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी

महाराष्ट्रात काल (26 मार्च) दिवसभरात 36,902 जणांना कोरोना संसर्ग झाला. तर , 17,019 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,37,735 वर पोहोचली आहे.

तर मुंबई शहरात काल 5513 जण कोरोना व्हायरस संक्रमित झाले. तर 1658 जण उपचार घेऊन बरे झाले. कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात 47504 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

पुणे जिल्हात गेल्या 24 तासात 7,090 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 3,756 जण उपचार घेऊन बरे झाले तर 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 4,99,784 इतकी आहे. त्यापैकी 4,37,185 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 9,761 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 53,008 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरु आहेत.