'Heroes of Mumbai' म्हणत कोरोना योद्धांच्या सुंदर पेटींग्सने सजले माहिम रेल्वे स्टेशन; पश्चिम रेल्वे कडून अनोखी सलामी
Painting of Corona Warriors at Mahim Railway Station (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि त्यामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) कठीण काळात नागरिकांच्या सेवे आणि सुरक्षेसाठी कोरोना योद्धांनी मोठे योगदान दिले. जीवाची बाजी लावत कोविड-19 (Covid-19) च्या संकट काळात नागरिकांसाठी त्यांनी अमूल्य कार्य केले. या कार्याची दखल देशातील विविध स्तरातून घेतली जात असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता पश्चिम रेल्वेने देखील पुढाकार घेत कोरोना योद्धांना अनोखी सलामी दिली आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) St+art India Foundation आणि पेंट कंपनी यांच्या सहयोगाने माहिम रेल्वे स्टेशनवर कोरोना योद्धांची सुंदर चित्रं साकारली आहेत. माहिम रेल्वे स्टेशन मुंबईचे खरे हिरो (Heroes of Mumbai) म्हणजेच कोरोना योद्धा (Corona Warriors) यांच्या सुंदर पेटिंग्सने सजले आहे.

याचे काही फोटोज समोर आले आहेत. यात आपल्याला पोलिस, सफाई कामगार, पीपीई कीट घातलेले डॉक्टर्स पाहायला मिळत आहेत. ही चित्रे अतिफ आणि राहुल मौर्य  या कलाकारांनी साकारली आहेत. "ही चित्रं कोरोना योद्धांची आहेत. या कठीण काळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो. ते आपले खरे हिरो आहेत," असे अतिफ यांनी सांगितले. दरम्यान ही चित्रं साकारण्यासाठी 10-12 दिवसांचा कालावधी लागला.

ANI Tweet:

तर राहुल मौर्य या दुसऱ्या कलाकाराने सांगितले, "कोरोना योद्धांसाठी ही आदरांजली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. कोरोना व्हायरस आपल्यासोबत खूप काळ राहणार असल्याने आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे."

दरम्यान महराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 120504 वर पोहचला असून 5751 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिवसागणित यात मोठी भर पडत असून मुंबईत राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 62875 वर पोहचला आहे. तर 3311 रुग्णांचा मृत्यू झाला असून 31856 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.