Representative Image | (Photo Credits: Pixabay)

पोलीस स्टेशन (Police Station) म्हटलं की खाकीतील कडक शिस्त आणि त्याच शिस्तीतून येणारी जरब बसवणारी भाषा. नागरिकांच्या तक्रारी आणि गुन्ह्यांचा पाढा, त्यातही कायदा, कलमं, पोटकलमं आणि सातत्याने गुन्हेगारी जगताशी संबंध, त्याविषयीच्या चर्चा, गुन्हेगार आणि आरोपी यांमुळे कोणत्याही पोलीस स्टेशनचे काम काहीसे रुक्षच असते. अशा वातावरणात एखादी रोमॅंटीक घटना घडावी, हे तसे दुर्मिळच. पण असे घडले खरे. वाशिम (Washim) येथील शिरपूर पोलीस स्टेशन (Shirpur Police Station) याला काहीसे अपवाद ठरले. या पोलीस स्टेशनमध्ये चक्क 'शुभमंगल सावधान' (Wedding In Police Station) असे सूर उमटले आणि एका प्रेमी युगुलाच्या वैवाहीक आयुष्याची सुरुवात झाली. नेमके घडले तरी काय? घ्या जाणून.

दोघांचे एकमेकांवर जीव. निस्सीम प्रेम. पण प्रेम असून काय उपयोग. आपल्या समाजव्यवस्थेत त्याला सामाजिक मान्यता म्हणजेच लग्न करायची परवानगी मिळायला हवी ना. चित्रपटातील कथा वाटावी असाच तो प्रसंग. दोघांच्याही प्रेमात कुटुंबीय खलनायक. दोघांच्याही घरुन प्रेमाला टोकाचा विरोध. दोघे हताश. काय करावं कळत नाही. वय वर्षे 23 असलेला तो आणि वय वर्षे 21 असलेली ती. दोघेही भांबावलेले. काय करावे? या विचारातच दोघांनी थेट पोलीस्टेशनच गाठलं.

पोलिसांसमोर जाऊन या प्रेमी युगुलाने आपलया प्रेमाची कबुली दिली. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करु इच्छितो. पण दोघांच्याही कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध आहे, असे सांगत आम्ही काय करायचं? असा अप्रत्यक्ष सवालच त्यांनी पोलिसांना विचारला. झाले. पोलिसांनीही त्यांची अडचण समजून घेतली. सर्व कायदेशीर बाबी तपासल्या. दोघेही सज्ञान असून विवाहासाठी एकमेकांना पूरक आहेत याची खातरजमा करुन घेतली आणि पोलीस स्टेशनमध्येच दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाकला. शिवाय, दोघांच्याही कुटुंबीयांकडून या नवदाम्पत्याला कोणताही त्रास होणार नाही याचीही खात्री करुन घेतली. पोलिसांच्या सहकार्यामुळे सुरु झालेल्या नव्या सहजीवनात वाटचाल करण्यासाठी हे नवदाम्पत्य आनंदाने मार्गस्त झाले.

दरम्यान, या हटके विवाहाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. परिसरात या विवाहाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी' असे म्हणत पालकांनीही आता या दोघांसमोर हात टेकले आहेत. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त त्यांच्याही हातात काही उरले नाही. विशेष म्हणजे, मुलीच्या वडीलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार खामगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पण, हे जोडपे पोहोचले सिव्हील लाईन्स पोलीसांमध्ये. पोलिसांनीही खामगाव पोलिसांना तशी माहिती देत पुढील कार्यवाही केली.