Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात हिवाळा चांगलाच जाणवू लागला आहे. काही ठिकाणी थंडी हुडहुडी भरवत आहे. मात्र, राज्यातील वातावरणात (Weather in Maharashtra) मोठा बदल जाणवणार असून पुढच्या काही दिवसांमध्ये वातावरण ढगाळ (Cloudy Weather in Maharashtra) राहणार आहे. या वातावरणामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai) शहरातील काही ठिकाणी आज (सोमवार 4 जानेवारी 2021) पहाटे आणि सकाळी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस ( Light Showers in Mumbai) झाला.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहरामध्ये सांताक्रुझ परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. याशिवाय कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यत आहे. उत्तर भारतातील काही भागात पाऊस पडला आहे. राजधानी दिल्ली येथेही काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीत मेघगर्जनेसह पाऊस बरसला.

उत्तर भारतामध्ये गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका पाहायला मिळाला. या ठिकाणी थंडीची बोचरी लाट आली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही झाला. महाराष्ट्रातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला. दरम्यान, उत्तर भारतातील राज्यांमध्ये हेवेची स्थिती चक्राकार आहे. त्यामुळे काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, हवेत बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळते आहे.परंतू, पुढचे चार दिवस महत्त्वाचे आहेत. या चार दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. तसेच, राज्याच्या तापमानातही मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

दरम्यान, येत्या सहा आणि सात जानेवारीला गोवा राज्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यात हवामान विभागाने व्यक्त केली आहे.