परतीच्या पावसासोबत मान्सून (Monsoon) परत गेला आणि ऑक्टोबर हिट (October Hits) जाणवू लागली की चाहूल लागते ती थंडीची. साधारण दिवाळी सणाच्या आसपास राज्यात काहीशी बोचरी थंडी हळूहळू आगमन करु लागते. पुढचे काही महिने ही थंडी मुक्काम ठोकून असते. ऋतुमानाचे हजारो वर्षापासून चालत आलेले चक्र पिढ्यानपिढ्या सवयीचे झालेले. पण, अलिकडील काळात या चक्राला काहीसा अडथळा आल्याचे जाणवते. भारतीय हवामान विभाग (IMD) वारंवार देत असलेल्या माहिती आणि व्यक्त करत असलेल्या अंदाजावरुन याची पुरेशी जाणीव होते. आताही हवामान विभागाने असाच अंदाज वर्तवला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभाग नोंदवतो. त्यामुळे यंदा काहीसे ' कडाक्याच्या थंडीत गार वारा, सोबत पावसाच्या धारा' असे वातावरण पाहायला मिळू शकते.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) पावसाचा अंदाज वर्तवतानाच हवामानाची माहिती देताना म्हणतो आहे की, यंदा राज्यात नोव्हेंबर महिन्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. मंगळवारी जारी झालेल्या एका मासिकात हवामान विभागाने हा अंदाज नोंदवला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेता घेता यंदा पावसाच्या धाराही नागरिकांना अनुभवता येणार आहेत. असे असले तरी वातावरण आणि ऋतुमानातील हा बदल शेतीसाठी मात्र आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. आगोदरच अवेळी आणि बेसुमार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. (हेही वाचा, Rain Update: मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी)
हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंज्य महापात्रा यांनी मंगळवारी (1 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्यात आर्द्रता आणणार्या हवामान प्रणालीवर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती अवलंबून आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबर महिन्यातही महाराष्ट्रात पाऊस पडताना दिसू शकतो. हा पाऊस सामान्य ते सामान्यापेक्षा अधिक प्रमाणात असू शकतो. त्यामुळे वातावरणातही बरेच बदल जाणवू शकतात. प्रामुख्याने दिवसभर थंड तर रात्री उबदार तापमान अनुभवायला मिळू शकते.