Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

सुरुवातीला दमदार बरसून गायब झालेला पाऊस (Heavy Rain) राज्यात पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. सक्रिय पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत (Maharashtra Rains Update) झाले आहे. नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. शेती पाण्याखाली गेली आहे तर काही गावांचा संपर्कही तुटला आहे. येत्या 11 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची स्थिती अशीच कायम राहील असा अंदाज (Weather Forecast) हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पाठिमागच्या 24 तासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. खास करुन कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सुमारे 330 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही रेड अलर्ट

हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने कोकणातील पालघर, रत्नागिरी आणि रायगड मधील काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील घाट परिसरात रेड अलर्ट आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातील काही ठिकाणी अलर्ट आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पाठमागील 24 तासात रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. लांजा तालुक्यात तब्बल 330 मिमी इतक्या सर्वोच्च पावसाची नोंद झाली. तर त्यासोबतच मंडणगडमध्ये 170 मिमी, देवरुख 140 मिमी, चिपळूण 140 मिमी, रत्नागिरीत 130 मिमी पाऊस, तर रायगडातील ताळामध्ये 210 मिमी, म्हसळात 190 मिमी, माणगावात 160 मिमी इतका पाऊस कोसळला. (हेही वाचा, Maharashtra Monsoon: कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी)

मुंबई, ठाणे ऑरेंज अलर्ट

मुंबई आणि ठाण्यातही पाठिमागील 24 तासात दमदार पाऊस पडतो आहे. या दोन्ही ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दमदार पावसामुळे मुंबईत सकल भागात पाणी साचले होते. साधारण रात्री अडीच ते सकाळी 8.30 पर्यंत मुंबईत 100 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या काही काळात पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होत जाईल असा अंदाज आहे. दरम्यान, पाठिमागच्या 24 तासात झालेल्या पावसाची नोंद वेधशाळेने घेतली आहे. त्यानुसार सांताक्रूज येथे 124 मिमी तर अंधेरी येथे 130 मिमी पावसाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी

मध्य महाराष्ट्रात झालेला पाऊस पुढील प्रमाणे- कोल्हापूर (राधानगरी) 200 मिमी, सातारा (महाबळेश्वर)- 190, कोल्हापूर (शाहूवाडी)- 150 मिमी, लोणावळा 140 मिमी इतक्या प्रमाणावर पाऊस पडला.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यात वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये 30 मिमी पावसाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. तर, विदर्भामध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.