मनसुख हिरेन प्रकरणाची एटीएस (ATS) चौकशी करत आहे. व्यवस्था केवळ एका व्यक्तीसाठी नसते. ती सर्वांसाठी काम करते. यावर आमचा विशवास आहे म्हणूनच हा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. असे असले तरी केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे (NIA) सोपवले आहे. याचाच अर्थ असा आहे की, यात काहीतरी हेतू आहे. हा हेतू उघडकीस आणेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प 2021-22 आज विधानसभा सभागृहात सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजि पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. विरोधक हे नेहमीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र विरोधाची भूमिका घेत आहेत, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case चा तपास ATS तर स्फोटकं सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करणार)
दरम्यान, विरोधी पक्ष सध्या राज्यातील विविध मुद्द्यांवरुन बोलत आहे. असे असले तरी एका मुद्दयावर मात्र विरोधक गप्प आहेत. ते म्हणजे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या. सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांनी महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली. त्यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीत त्यांची सुसाईड नोटही सापडली आहे. त्यातून अनेकांची नावे पुढे आली आहेत. अनेक खुलासे झाले आहेत.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होईल. मग ते किती का मोठे असेनात. सर्वांची चौकशी केली जाईल. व्यवस्था कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे तर सर्वांसाठी काम करते असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.