पुणेकरांनो आजच टाकी फूल करा! उद्या नळाला नसेल पाणी
Water Crisis in Pune | (Photo Credit: File Photo)

Water Crisis in Pune: पाण्याची टाकी कोरडी ठणठणीत जर पाहायची नसेल तर पुणेकरांनो तुमची टाकी आजच फूल करा. कारण, उद्या म्हणजेच गुरुवारी (6 फेब्रुवारी) तुमच्या नळाला पाणी येणार नाही. अहो, तुमच्याच कशाला, संपूर्ण पुणे (Pune) शहरात कुणाच्याच नळाला पाणी येणार नाही. पुणे महापालिकेनेच (Pune Municipal Corporation) तशी सूचना दिली केली आहे. त्यामुळे उद्याची पाणीबाणी टाळण्यासाठी आजच थोडे कष्ट घ्या. महत्त्वाचे म्हणजे पाणी जपून आणि पुरवून वापरा. महापालिकेच्या भाषेतच सांगायचे तर, पाण्याचा अपव्यय टाळा.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (7 फेब्रुवारी) संपूर्ण शहरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे पुणेकरांना शुक्रवारीही पाणीतुटवड्याचा सामना करावा लागू शकतो, असे महापालिकेने म्हटले आहे. या वेळी जलशुद्धीकरण आणि दुरुस्तीची इतरही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते. (हेही वाचा, महाराष्ट्रात तब्बल 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यांत गंभीर परिस्थिती)

राज्यात असलेला कमी पाऊस, त्यामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई , शहरांतील पालिकांचे गैरव्यवस्थापण आणि नागरिकांची बेशिस्त आदी कारणांमुळे पाणीटंचाईच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणीबाणी टाळण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये जलव्यवस्थापनावर काम होताना दिसते आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबई येथेही पाणीपुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता पुण्यातही होताना दिसते आहे.