Water crisis Representative Image (Photo Credit: Facebook/ Ek boond Pani)

सध्या देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) चालू आहेत. देशातील सर्वात मोठ्या निवडणुका म्हणून मतदारांना अनेक आमिष दाखवले जात आहे. देशातीत सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात जनतेसाठी अनेक वचणे नमूद केली आहेत. मात्र अजूनही जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आजही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यांमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई (Water Shortage)आहे. सध्या उन्हाळ्यात तर इतकी भयावह परिस्थिती  आहे की, लोक हंडाभर पाण्यासाठी एकमेकांना मारायला उठले आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये पाण्यासाठी स्त्रिया चक्क मारामारी करताना दिसत आहेत.

सामना या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. भिवंडी तालुक्यातील मैदे गावात विहिरी आणि बोरिंगचे पाणी आटल्यामुळे गावात फक्त एकच पाणवठा शिल्लक राहिला आहे. या पाणवठ्यालाही पुरेसे पाणी येत नाही, त्यामुळे महिला रात्रीपासूनच रांग लावून बसत आहेत. अशात एका महिलेला पाणी न मिळाल्याने ती रांग मोडून पाणी घेत असताना काही महिलांनी तिला अडवले, आणि भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या महिलेला अगदी जमिनीवर लोळवून तिला दूर करण्याचा प्रयत्न केला गेला.

(हेही वाचा: मुंबई धरणांमध्ये उरला अवघा 26% पाणीसाठा; मागील 2 वर्षातील एप्रिल महिन्यातील नीच्चांक)

सध्या मुंबई परिसरात बहुतेक सर्व ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा चालू आहे. ठाणे जिल्ह्यात अनेक धरणे आहेत, मात्र त्याचा फायदा या आसपासच्या गावांना होत नाही. याबाबत प्रशासनाकडे गाऱ्हाण मांडूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे आता नवीन येणारे सरकार तरी याकडे लक्ष देईल अशी अशा आहे.