वाशिम जिल्हा परिषदेकडून (Washim Zila Parishad) एक नवा स्तुत्य निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जी मुलं आपल्या आईवडीलांना वार्यावर सोडून देतील अशा कर्मचार्यांना त्यांच्या वेतनातील 30% रक्कम आई वडीलांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करावी लागणार आहे. दरम्यान मटाच्या वृत्तानुसार, अशा प्रकारे वाशिम ही विदर्भातील एकमेव जिल्हा परिषद असल्याची दावा त्यांनी केल्याचं म्हटलं आहे.
वाशिम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला. जे कर्मचारी आईवडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत त्यांना आता त्यांच्या पगारातील 30% रक्कम आई वडीलांच्या बॅंकेमध्ये जमा करावी लागणार आहे. हा निर्णय पंचायत समितीनंतर जिल्हा परिषदेमध्येही घेण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांच्या आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. पहिल्यांदा कर्मचार्याशी बोलून त्याला पालकांचा सांभाळ करण्याची ताकीद दिली जाईल. मात्र त्या कर्मचार्याने टाळाटाळ केल्यास त्याच्या वेतनामधून 30% रक्कम कापली जाईल अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.