बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणानंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाले. याच कराडला आज बीड येथील केज कोर्टात हजर करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी त्याच्यावर मकोका (MCOCA) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर खंडणी प्रकरणात आगोदरच गुन्हा दाखल असून आज त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या आधी तो पोलीस कोठडीत होता. जी आज संपत होती. त्यामुळे त्याला कोर्टात हजर केले असता त्याच्यावर मकोका लावण्यात आला.
कराड याच्या पोलीस कोठडीची मागणी
वाल्मिक कराड यास कोर्टात आणल्यावर सुनावणीस सुरुवात झाली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कट रचल्याचा आरोप ठेवलाआहे. दरम्यान, तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या वेळी सरकारी पक्षाकडून त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यावर त्यास न्यायालयीन कोठडी दिली. सरकारी पक्षाकडून आपण वाल्मिक याचे व्हाईस सॅम्पल गेतले असून त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त केल्याचेही कोर्याला सांगण्यात आले. शिवाय, त्याने कमावलेली संपत्ती ही कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का, याशिवाय त्याची देशाबाहेरही काही संपत्ती आहे का, याचा तपास करायचा असल्याने आम्ही त्याची पीसीआर मागत असल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, कोर्टाने त्यास पोलीस कोठडी सुनावली नाही. (हेही वाचा, Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का')
बचाव पक्षाचा जोरदार युक्तिवाद
वाल्मिक कराड याची बाजू अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली. या वेळी ठोंबरे यांनीही जोरदार युक्तीवाद केला आणि सरकारी पक्षाच्या मागणीवर आक्षेप नोंदवला. ठोंबरे युक्तिवादादरम्यान म्हणाले, वाल्मिक कराड हा पाठिमागील 15 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. या आधीच्या सुनावणीत मांडलेलेच मुद्दे सरकारी पक्षाने पुन्हा एकाद मांडले आहेत. या आधीही त्यांच्यावर दाखल असलेले 14 गुन्हे नील झाले आहेत. जर सरकारी पक्षास त्यांच्या संपत्तीबाबत चौकशी करायची असेल तर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व बाबी खुल्या असताना पोलिसांना आणखी काय चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
आता पुढे काय?
वाल्मिक कराड याला आज बीड येथील कारागृहात नेले जाईल. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होईल. त्यांच्यावर मकोका दाखल केल्यामुळे त्यांना त्या कायद्याखाली पुन्हा एकदा केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, आता सेशन कोर्टामध्येही सीआयडीने अर्ज दाखल केल्याने पुढे काय घडते याबाबत उत्सुकता आहे.