राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे (DHFL) प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhwan) यांचे प्रकरण समोर आले होते. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांचे शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह 23 जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. दरम्यान, वाधवान यांना लॉकडाउनदरम्यान प्रवासासाठी विशेष परवानगीचे पत्र कोणाच्याही दबावाविना आपणच दिल्याचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ही माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र करोनाच्या लढाईशी लढत असताना मधल्या काळात या पत्रावरुन जे राजकारण करण्यात आले हे दुर्देवी होते, अशीही खंत अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
नुकतीच अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान ते म्हणाले आहेत की, “या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबियांना मुंबईहून महाबळेश्वर जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आले होते. ते पत्र स्वतः आपणच दिल्याचे अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असेही त्यांनी चौकशीत म्हटले आहे." हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनाला घाबरून न जाता आत्मविश्वासाने लढा देण्याचे RSS प्रमुख मोहन भागवत यांचे आवाहन; पालघर लिंचिंगवर विचारला 'हा' प्रश्न
लॉकडाउनच्या काळात गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचं शिफारस पत्र घेऊन प्रवास करणारे डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धिरज वाधवान यांना सीबीआयच्या पथकाने आज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर कोरोनाविषाणूचे संकट वावरत असताना वाधवान यांच्या पत्रावरून राजकारण पेटले होते. यापूर्वी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारेच पुढे होते हे दुःखदायक आहे, अशा शब्दांत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टोला लगावला.