एकीकडे देशातील महिला सुरक्षित नाहीत म्हणायचे, तर दुसरीकडे मुलींवर ‘सातच्या आत घरात’ हा नियम लादायचा. यावर एक उपाय म्हणजे स्वबचाव (Self defense), याची जनजागृती व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले जातात. मात्र किती मुली ही गोष्ट शिकून त्याचा अवलंब करतात? पुरुषांइतके शारीरिक बल नाही म्हणून स्वबचावाचा तितकासा फायदा होत नाही अशी मुलींची भूमिका असते. मात्र हीच समजूत मोडीत काढणारी एक घटना मुंबईमधील एका लोकलमध्ये घडली आहे. आश्चर्य म्हणजे यातून स्वतःचा बचाव करणारी ही मर्दानी चक्क अंध आहे. लोकलच्या प्रवासादरम्यान एका नको असणाऱ्या स्पर्शाची जाणीव या मुलीला झाली. स्वबचावाचे धडे घेतलेल्या या मुलीने वेळीच त्या तरुणावर हल्ला करून त्याचे हात पकडून ठेवले, व पुढील स्टेशन आल्यावर चक्क त्याला गुढगे टेकायला लावून पोलिसांच्या हवाली केले.
ही अंध मुलगी दादर येथील अंध मुलांच्या शाळेत शिकते. रात्री 8 च्या सुमारास दादरवरून ती आपल्या वडिलांसोबत कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनमधील, अपंग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या डब्यात चढली. लोकल सुरु होताच विशाल सिंग (वय 24) या तरुणाने तिच्या अपंगत्वाचा फायदा घेत तिला स्पर्श करायला सुरुवात केली. ही गोष्ट लक्षात येताच क्षणार्धात तिने त्या तरुणावर हल्ला करून, त्याचा हात पकडून तो मागे पिरगळला. शेवटी वडील आणि इतर प्रवाशांच्या मदतीने पुढील माटुंगा स्टेशनवर या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दरम्यान, कराटेचे धडे घेतलेल्या या मुलीने त्या तरुणाला अस्मान दाखवले, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी तिचे कौतुक केले.
ही मुलगी अंध असल्याने, अशा प्रकारच्या तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यांना शाळेतच स्वसुरक्षा व कराटे शिकवले जातात. अशा गोष्टींत तरबेज असल्याने आज ही मुलगी स्वतःचे संरक्षण करू शकली. अशा प्रकारे भारतातल्या प्रत्येक मुलीने स्वरक्षणाचे धडे घेतले, तर कोणत्याही व्यक्तीची त्यांच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही.