महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार येथील एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये पती-पत्नीसह तीन जण मृतावस्थेत आढळले आहेत. येथे एका आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमधील पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहत होते. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव उदय कुमार काजवा (52) असे आहे. तो त्याची पत्नी वीणा उदय कुमार काजवा (42 वर्षे) आणि मुलगी शिवलिका उदय कुमार काजवा (5वर्षे) यांच्यासोबत राहत होता.
उदय बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांशी झुंजत होता. सोसायटीच्या देखभालीसाठी देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, मंगळवारी या जोडप्याचा मुलगा शाळेत असताना ही घटना घडली असावी. दुपारी 4 च्या सुमारास तो घरी परतला तेव्हा दार वाजवल्यानंतर त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आई-वडील रुग्णालयात गेले असतील, असे गृहीत धरून तो एका मित्राच्या घरी गेला. नंतर, त्याच्या मित्राच्या आईसोबत, त्याने पुन्हा घरी येऊन दार वाजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या पालकांचे फोनही बंद असल्याने, त्याने रात्र त्याच्या मित्राच्या घरी घालवली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार , दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मुलगा घरी परतला तेव्हा त्याला घटनास्थळी पोलीस आढळले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी त्यांना फोन केला होता. आत त्याला त्याच्या वडिलांचा मृतदेह आढळला, तर त्याची आई आणि बहीण जमिनीवर मृतावस्थेत पडलेली होती. बोलिंज पोलिसांचे निरीक्षक प्रकाश सावंत यांनी पुष्टी केली की मृत्यूची नेमकी कारणे शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अधिकारी संभाव्य सुसाईड नोटसाठी अपार्टमेंट आणि पत्नीच्या लॅपटॉपची देखील तपासणी करत आहेत. (हेही वाचा: Maharashtra Horror: पोटच्या मुलींवर बापाकडून बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात; पत्नीचाही छळ, आरोपीस सिंधुदुर्ग येथून अटक)
मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि बाल कल्याण समितीकडे सोपवले आहे, कारण त्याची काळजी घेण्यासाठी जवळचे नातेवाईक उपलब्ध नव्हते. तपासात असे दिसून आले की, हे कुटुंब मूळचे कर्नाटकचे होते. या पुरूषाच्या भावाने पोलिसांना सांगितले की त्याचा पत्नीला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. पत्नी मानेच्या कर्करोगाशी झुंजत होती आणि त्यांची पाच वर्षांच्या मुलीलाही विशेष लक्ष देण्याची गरज होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आर्थिक अडचणी या दुर्घटनेचे मूळ कारण होत्या. पत्नीवर केमोथेरपी उपचार सुरु होते. त्यामुळे तिच्या वैद्यकीय खर्चाचा भार आणि श्रवणदोष असलेल्या त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी यामुळे या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता.